Close

जुलै 23, 2018

पॉवरगोठ्याची अपेक्षित नमुना रचना / डिझाईन

दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते.   मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे. 

 

हो का? मालक, आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत.

 

अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!!   

 

तुमची का-कु आली लक्षात !   सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन नोंदवही तुमची मदत करू शकते. 

 

तर जसा आकडेमोडी वरून गोठ्यातील फायदा तोटा लक्षात येतो. तर अशीच एखादी सोपी पद्धत आहे का की गोठ्याकडे पाहिल्या पाहिल्या एका नजरेत तिथली आर्थिक परिस्थिती लक्षात येईल ?  अशी टेक्नॉलॉजि आहे का ?

 

तुम्हाला ऐकायला वाचायला नवल वाटेल – पण नक्कीच अशी पद्धत आहे.

 

गोठ्याचे एकूण आरोग्य, आर्थिक किंवा व्यवस्थापकीय आरोग्य – गोठ्याकडे एक नजर टाकल्या टाकल्या ध्यानात येण्याची एक क्लृप्ती आहे.

ती म्हणजे गोठ्याची रचना …

तुमच्या गोठ्यात फक्त जनावरे – गाई किंवा म्हैशी असली तरी, गाभण गाई, कालवडी, व्यायला झालेल्या गाई, नुकत्याच व्यालेल्या गाई इत्यादींच्या गरजा आणि त्यांची घ्यावयाची काळजी यामध्ये बराच फरक आहे.  तुम्ही तुमचा गोठा कसा डिझाईन केलाय, या विविध अवस्थेतील जनावरांची तुम्ही काय सोय केलीय, यावर बऱ्याच नफा-तोट्याच्या गोष्टी अवलंबून असतात.

गोठ्याची रचना कशी असावी – एक आदर्श पॉवरगोठ्याची रचना कशी असावी यावर आम्ही बराच विचार केला आणि एक नमुना अपेक्षित रचना तयार केली.  त्या गोठा रचनेचा उहापोह आपण पुढे करूयात.

 

अशा गोठा रचनेची गरज

गोठा फायद्यात तेव्हा असतो, जेव्हा गोठ्याचे उत्पन्न त्या गोठ्यात होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक असेल.  

पॉवरगोठ्यातील दूध उत्पन्न

उत्पन्नातील सिंहाचा वाटा असतो दुधाचा !! म्हणजेच गोठ्याचे उत्पन्न भरपूर येण्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

 

   1. दुधाचे भरपूर उत्पन्न येणे – यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.
    1. प्रति गाय भरपूर उत्पन्न येणे
    2. प्रति गाय दुधाचे उच्च दर्जाचे उत्पन्न येणे – यात खालील गोष्टी आल्या
     1. गाईचे फॅट लागणे
     2. गाईचे SNF चांगले लागणे
   2. दुधाचे उत्पन्न सातत्यपूर्ण असणे
    1. वर्षभर गोठ्यात एकसारखे दुग्ध-उत्पादन असणे (लिटर संख्ये मध्ये)
     1. गोठ्याचे योग्य नियोजन असणे
     2. गाई वेळेवर माजावर येणे
     3. गाई आजारी न पडणे
    2. गाईंना योग्य वेळी योग्य आहार योग्य प्रमाणात मिळणे

 

अतिशय बारकाव्याने निरीक्षण केल्यास ध्यानात येईल की वरील मुद्दे १ आणि २ एकमेकांशी संबंधित, एकमेकांवर अवलंबून आहेत. दुधाचे भरपूर उत्पन्न येण्यासाठी प्रतिगाय भरपूर उत्पन्न आले पाहिजे. प्रतिलिटर दुधाला दर चांगला आला पाहिजे. त्यासाठी प्रतिलिटर प्रतिगाय फॅट आणि डिग्री उत्तम लागली पाहिजे.  या सर्वासाठी गोपैदास उत्तम झाली पाहिजे. उत्तम पैदाशीतून निर्माण झालेली गाय, आजारी पडता कामा नये.  अशी गाय वेळेवर माजावर आली पाहिजे.

उत्तम माज, आजारी न पडणे आणि भरपूर योग्य दर्जाचे दूध यासाठी अशा गाईने योग्य वयात योग्य प्रमाणात योग्य आहार घेतला पाहिजे.

अहो बास झाला की आता, किती डोक्यात कुटाणा करताय  – कामाचा बोला …. पुस्तकी बडबड भरपूर केलीत.

बरोबर आहे तुमचा येतो मुद्द्यावर – आता फक्त एवढे लक्षात ठेवा की उत्तम उत्पादनासाठी मुख्य उत्पादनघटक आहे तो म्हणजे गाईचं जेवण … आणि त्यावर होणारा आदर्श – म्हणजेच योग्य व किमान खर्च !!

पॉवरगोठ्यातील उत्पादन खर्च

गोठ्यात अनेक प्रकारचे खर्च असतात, यातील सर्वात मोठी कात्री लावणारा खर्च असतो – तो म्हणजे खाद्य खर्च. आता या खर्चाला कात्री लावायची असेल तर तुम्हाला हुशार व्हावे लागेल. आणि त्यासाठी त्या खर्चाचा योग्य अभ्यास करावा लागेल.

ओके –  करा अजून डोक्याचा कुटाणा

संयम बाळगा

आता खाद्य खर्चामध्ये कोणकोणते प्रकार येतात ते पाहू

     1. दुधातील गाईवरील खाद्यखर्च
      1. दुधातील गाभण नसलेल्या गाईंवर केलेला खाद्य खर्च
       1. पशुखाद्य
       2. हिरवा चारा
       3. सुका चारा
       4. सप्लिमेंट्स
      2. दुधातील नुकत्याच गाभण (३-६ महिने) राहिलेल्या गाईवरील खाद्यखर्च –
       1. पशुखाद्य
       2. हिरवा चारा
       3. सुका चारा
       4. सप्लिमेंट्स
     2. आटवलेल्या गाईंवरील खर्च
       1. पशुखाद्य
       2. हिरवा चारा
       3. सुका चारा
       4. सप्लिमेंट्स
     3. कालवडींवरील खर्च
       1. पशुखाद्य
       2. हिरवा चारा
       3. सुका चारा
       4. सप्लिमेंट्स

 

आता तुम्ही म्हणाल वर काय रिपीट रिपीट तेच तेच लिहिलेय, प्रत्येकाला पशुखाद्य हिरवा चारा व सप्लिमेंट लागणारच आहे की

हो नक्कीच ! पण त्या प्रत्येक प्रकारच्या जनावराला लागणारा आहार प्रत, प्रमाण यामध्ये वेगवेगळा आहे.

काय राव, गाईच आहेत की सर्वच्या सर्व त्यात काय प्रकार करून बसलात.

सांगतो – ए बी शी डी पासून सांगतो

कोणत्याही गाईच्या गोठ्यात मुख्यतः ६ प्रकारची जनावरे असतात. 

     1. दुधातील नुकत्याच व्यायलेल्या गाई
     2. दुधातील कृत्रिम रेतन केलेल्या गाई (०-३ महिने )
     3. दुधातील गाभण राहिलेल्या गाई  (३-७ महिने )
     4. दुधातील आटवलेल्या गाई (७-९ महिने)
     5. कालवडी ६ महिने वयापर्यंतच्या
     6. कालवडी ६ महिने वया पुढील

तसा पाहिलं तर गाभण काळातील प्रत्येक महिन्या प्रमाणे वर्गीकरण करता येते,  परंतु हे ६ प्रकारचं  किमान वर्गीकरण पुरेसे आहे.

आता तुम्ही सांगा – वरच्या सर्व प्रकारातील गाईंचा आहाराची गरज सेम असेल का ???  

काय सांगताय – बिलकुल नाही, सगळ्यांना वेगवेगळा आहार लागेल

मग तुम्ही वेगवेगळा आहार वेगवेगळ्या प्रमाणात टाकताय का ?  सर्वानाच एकसारख्या प्रमाणात खाद्य पडत असेल, तर नक्कीच काही जनावरांना गरजेपेक्षा जास्त आणि काही जनावरांना गरजेपेक्षा कमी खायला मिळतेय.

मग फॅट आणि डिग्री लागली नाही, दूध कमी आले की चारा बदला, औषधे, सप्लिमेंट्स चा मारा करा व्हॉटसॅप ग्रुपवर प्रश्न विचारा  इत्यादी इत्यादी उपाय आले. तरीही ज्या गाईला ज्या प्रमाणात जो आहार पाहिजे तो मिळत नाही.

हे कसं शक्य आहे ?  हाय ती कामं उरकणात आम्हांला आणि तुम्ही नवनवीन उपाय सांगा.

 

नक्कीच शक्य आहे, आम्ही सांगतो त्या सिस्टीम मध्ये हे शक्य आहे.

 

योग्य वयात, योग्य गाभण स्थितीनुसार खाद्य खर्च अड्जस्ट करायचा असेल तर जनावरे वेगवेगळी ओळखता आली पाहिजेत. त्यासाठी केवळ टॅगिंग किंवा नावे देऊन भागणार नाही.

रोज लक्ष दिले पाहिजे – कोणत्या प्रकारची गाय, कोणत्या अवस्थेमध्ये किती खात आहे.  

आमचे स्पष्ट उत्तर आहे, रोज आम्हाला इतक्या बारकाव्याने लक्ष देता येत नाही.  

कोणालाच देता येत नाही.  अहो कंटाळा येईल की ….  आणि सारासार विचार करता एवढे बारकाईने लक्ष दिल्यास इतर महत्वाच्या गोष्टी बाजूला राहतील. 

मग रोज लक्ष न देता एकदाच सिस्टीम बसवली आणि ती विनासायास चालू राहिली तर ?  

शक्य आहे ?

 

हो हे शक्य आहे – त्यासाठी गोठ्याची रचना आदर्श हवी.

पॉवर गोठ्याची आदर्श रचना

लोकांना येणाऱ्या अडचणी लक्षात आल्या अन  मग आमची टीम कामाला लागली आणि आमच्या टीम ने आदर्श पॉवरगोठ्याचे डिझाईन तयार केले.   आदर्श पॉवरगोठ्या मध्ये प्रत्येक वेगवेगळ्या अवस्थेतील जनावरे वेगवेगळ्या कप्प्यात असतात आणि त्यांना त्यांच्या गाभण, आटवलेल्या इत्यादी अवस्थेतील गरजेनुसार चारा, काळजी, औषधोपचार इत्यादी पुरवले जाते. त्यांचा वेगवेगळा हिशोब मांडला जातो.   ही तर फारच पुढची पायरी आहे. 

 

आपण कमी खर्चात किमान पद्धतीने काय करू शकतो ?

पॉवरगोठ्याची  अपेक्षित नमुना रचना

किमान बदल करायचे असतील तर वर उल्लेख केलेल्या ६ हि प्रकारच्या गाई तुम्ही वेगवेगळ्या कप्प्यात टाकल्या पाहिजेत.  पुढील प्रकारे हे सोप्या पद्धतीने करता येईल. 

 

कप्पा क्र. १ – नुकत्याच व्यायलेल्या गाई ९-१२ महिने

कप्पा क्र. २ – कृत्रिम रेतन केलेल्या गाई ०-३ महिने

कप्पा क्र. ३ – दुधातील गाभण गाई ३-६ महिने

कप्पा क्र. ४ – आटवलेल्या गाई ६-९ महिने

कप्पा क्र. ५ – कालवडी ०-६ महिने

कप्पा क्र. ६ – कालवडी ६ महिने पुढील

 

तुम्हाला सोपे समजावे म्हणून खाली एक तक्ता बनवला आहे त्यातून तुमच्या ध्यानात येईल.

 

नुकत्याच व्यायलेल्या गाई ९-१२ महिने

कप्पा क्रमांक १

कृत्रिम रेतन केलेल्या गाई ०-३ महिने

कप्पा क्रमांक २

दुधातील गाभण गाई ३-७ महिने

कप्पा क्रमांक ३

आटवलेल्या गाई ६-९ महिने

कप्पा क्रमांक ४

कालवडी ०-६ महिने

कप्पा क्रमांक ५

कालवडी ६ महिने पुढील

कप्पा क्रमांक ६

आता हे कप्पे क्रमांक आणि त्यांची एकमेकांशी असलेली जागा अशीच असली पाहिजे असे नाही, तुमच्या सोयीनुसार कप्प्यांना क्रमांक किंवा नावे द्या आणि जागेच्या उपलब्धतेनुसार कप्पे तयार करा.  वरील आकृती फक्त नमुना आणि समजायला सोपी अशी केली आहे.  त्यात काय काय अपेक्षित आहे ते खाली पाहू.

कप्पा क्र १ मध्ये तुमच्या नुकत्याच व्यायलेल्या गाई आहेत, ज्यांचे दूध चालू झाले आहे, कप्पा क्र ४ मध्ये आटवलेल्या गाई आहेत, ज्यांचे दूध बंद आहे, परंतु लवकरच चालू होणार आहे.  म्हणजेच कप्पा क्र १ आणि ४ मध्ये तुमच्या गोठ्याच्या उत्पादनाचा भविष्य आहे.

कप्पा क्र २ मध्ये दुधातील, माजावर येऊन कृत्रिम रेतन केलेल्या गाई आहेत. ज्या गाभण आहेत, का उलटल्या आहेत याची खात्री नाही.  म्हणजेच व्यायल्यानंतर ३-६ महिने काळातील किंवा गाभण ०-३ महिने काळातील गाई या कप्प्यात असतील.

कप्पा क्र ३ मध्ये गाभण असल्याची खात्री झालेल्या आणि दुधाचे उच्च उत्पादन देणाऱ्या गाई आहेत, म्हणजेच गाभण ३-७ महिने काळातील गाई या कप्प्यात आहेत. २ आणि ३ क्रमांकाच्या कप्प्यांमध्ये तुमच्या गोठ्यातील सोने आहे.

 

कप्पा क्र ५ आणि ६ मध्ये ६ महिने आणि त्यापलीकडील कालवडींचा समावेश असेल.

 

वरील कप्प्यामधली हालचाल खालील प्रकारे होईल.

नुकत्याच व्यायलेल्या गाई कप्पा क्र १ मध्ये आहेत

व्यायलेल्या गाईचे कृत्रिम रेतन २-३ महिन्यात करावे, कृत्रिम रेतन केलेली गाय कप्पा क्र २ मध्ये सरकेल.  अशी गाय जर उलटली नाही, गाभण राहिल्याची खात्री डॉक्टरांनी ३ महिन्यानंतर केली तर कप्पा क्र ३ मध्ये सरकेल. जर अशी गाय उलटली तर ती पुन्हा कप्पा क्र. १ मध्ये येईल.

 

गाभण राहिलेली गाय ३-७ महिने गाभण काळापर्यंत कप्पा ३ मध्ये राहील.  गाय आटवायला सुरवात झाली की ती कप्पा क्र ४ मध्ये सरकेल.

 

गाय व्यायल्यानंतर कप्पा क्र १ मध्ये असेल, तिची कालवड कप्पा क्र. ५ मध्ये असेल.  ही कालवड ६ महिने झाल्यानंतर कप्पा क्र ६ मध्ये सरकेल.

कालवड १८-२४ महिने वय झाल्यावर २५०-३०० किलो वजन झाल्यावर कृत्रिम रेतन करावे. अशी कालवड वेल्यानंतर पुन्हा कप्पा क्र १ मध्ये तिची एंट्री होईल हे चक्र कायम चालू राहील.

आजारी गाई

याव्यतिरिक्त गाई आजारी पडल्यास त्या वेगळ्या कप्प्यात किंवा गोठ्याच्या बाहेर बांधाव्यात. जेणेकरून औषधोपचार सोपा होईल तसेच संसर्गजन्य आजार असल्यास इतर गाई त्यापासून बचावतील.  जर अशा गाईचे दूध पिण्यालायक नसेल तर ते सहजरित्या वेगळे काढून नष्ट करता येईल.

नमुना पॉवरगोठा रचनेचे फायदे

वरीलप्रमाणे पद्धतशीर गोठा विभाजन केल्यावर मालकाला तसेच बाहेरच्या कोणत्याही डॉक्टर, किंवा पॉवरगोठा मधील सल्लागारासाठी सुद्धा गोठ्याकडे एक नजर टाकल्या टाकल्या गोठ्यात किती गाई दूध देणाऱ्या किती आटवलेल्या आहेत हे क्षणात कळते.

 

वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये गरजेनुसार खाद्यपुरवठा करता येतो आणि खाद्य खर्चात मोठी बचत होते.

गोठ्याचे नियोजन सुधारते – गोठ्याचे उत्पन्न एका पातळीवर सातत्यपूर्ण चालू राहण्यासाठी, नवीन गाय विकत आणणे, अपेक्षित उत्पादकता नसलेली (अपेक्षित दूध न देणारी) गाय विकणे,  योग्य संख्येमध्ये गाई गाभण असणे इत्यादि गोष्टी प्रत्यक्षात आणता येतात.

तुम्ही तुमच्या गोठ्यात वरिलप्रकारे बदल हळूहळू घडवून आणावेत.  तुमचा अनुभव कसा आहे हे कमेंट्स/प्रतिक्रिया मधून किंवा ईमेलद्वारे आम्हाला कळवा.

कमी दूध-दर असताना फायद्यातील दूध-धंद्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

One Comment on “पॉवरगोठ्याची अपेक्षित नमुना रचना / डिझाईन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत