Close

ऑक्टोबर 17, 2016

शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे.  शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप साऱ्या शेळ्या पाळत असतात. परंतु सद्यस्थितीत शेळ्या चरायला घेऊन जाणे अशक्य होऊन बसले आहे. शेळीपालन करताना शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध प्रश्न भेडसावत असतात, ज्यांची ना मिळाल्या मुळे शेळीपालन पासून ते दूर चालले आहेत. असे कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया.

शेळीपालन करताना पडलेले प्रश्न

  1. जास्त संख्येने शेळीपालन कसे करायचे ?
  2. बंदिस्त शेळीपालन कसे करायचे ?
  3. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेळीपालन मधून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल ?
  4. सुरुवातीला कोणती जात निवडायची ?

असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. या सर्व गोष्टींचा आपण या लेखात व या पुढील लेखांमध्ये सविस्तर अभ्यास करूया.

शेळी पालनाचे उद्दिष्ट

शेळीपालन करताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्चित करणे. बरेचशे शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदासीसाठीच विक्री करायची असा उद्दिष्ट ठेवतात. बऱ्याचदा योग्य दर न मिळाल्यास नाराजी वाढते. असा उद्दिष्ट ठेवायला काही हरकत नाही मग त्यासाठी खूप जास्त मागणी असणाऱ्या शेळ्यांच्या जातीची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरु करावा लागतो. सुरुवातीला स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालन पेक्षा अश्या प्रकारात जास्त गुंतवणूक असते.
आपल्या गोठ्यातील शेळी हि स्थानिक जातीची असली तरी तिला चांगला जातिवंत जास्त वाढ असलेल्या जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांची पैदास होऊ शकते व अश्या प्रकारचे बोकड हे कमीत कमी वयात जास्त वजन देणारे असतात. म्हणून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारे बोकड तयार करणे हे देखील चांगले उद्दिष्ट असू शकते व त्यातुन नफा मिळवता येईल.

उस्मानाबादी बोकड

आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या स्थानिक शेळ्यांपासून सुरुवात करणे फायद्याचे व कमी खर्चातील सहज सोपे असते. सुरुवातीला आपल्याकडील शेळीला उस्मानाबादी बोकड वापरला जावा, त्यांच्या संकरातून तयार होणाऱ्या शेळीला सिरोही किंवा जमुनापरी सारखे बोकड वापरले जावेत. जेणेकरून जन्माला करडे हि जन्मतः जास्त वजनाची वेगाने वजन वाढनारी असतिल.

थोडक्यात काय तर उस्मानाबादी शेळ्यांमधील 3 करडे होण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती व सिरोही शेळ्यांमधील वजनवाढीची ताकद, दूध देण्याची क्षमता ग गोष्टी त्यांच्या संकरातून होणाऱ्या करडांमध्ये दिसून येतात. अशा प्रकारे पुढील पिढ्यांमध्ये पुन्हा आपण जमुनापरी, बीटल , बोअर अशा जातीच्या बोकडांचा वापर करून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारी शेळ्यांची करडे तयार करू शकतो. आपल्याकडे असणारया स्थानिक शेळीला उस्मानाबादी, जमुनापरी, सिरोही, बीटल, बोअर, किंवा एखादी उपलब्ध असलेली जातिवंत शेळीची जात वापरून सुधारित बोकडांची निमिर्ती करता येऊ शकते, अश्या प्रकारे या बोकडांमधून स्थानिक मार्केटमध्ये पण चांगला नफा मिळतो.

शेळीपालनासाठी करावयाचे नियोजन

शेळीपालन करताना बंदिस्त गोठ्याचे नियोजन, चाऱ्याचे नियोजन, किंवा व्यवस्थापन या सर्व गोष्टीना फक्त उपयुक्त आणि सुधारित शेळीच्या असण्यामुळेच महत्व प्राप्त होते. अश्या प्रकारे संकरन करून तयार केलेल्या शेळ्यांना त्यानंतर तितक्याच चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक ठरतात.

  1. बंदिस्त पद्धतीचा गोठा यामध्ये प्रत्येक शेळीस कमीत कमी 15 ते 20 sq ft जागा दिली जाते. व गोठ्यामध्ये वयोगटानुसार कप्पे केले जातात . त्यामुळे सर्व व्यवस्थापन करणे सोपे जाते व शेळीला आपण कळपात असल्यासारखे वाटते.
  2. शेळ्या खरेदी करण्यापूर्वी त्यांना महत्वची लागणारी ओली वैरण, सुका चारा, व खुराक यांचे नियोजन असणे महत्वाचे आहे. ओल्या वैरणीत शेळ्यांना सुबाभूळ, शेवरी, दशरथ अशा प्रकारचा झाडपाला पण देणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर चीकातील मका, निसवलेले ज्वारीचे कडवाळाचा मुरघास बनवनेही फार फायद्याचे ठरते.
  3. दर 3 महिन्याला जंताचे औषध व त्याचबरोबर पी पी आर , आंत्रविषार सारख्या रोगांचे लसीकरण तयार केलेल्या सुधारित शेळ्यांना किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्यांना करणे फार गरजेचे असते. गाभण शेळ्यांनाही जंताचे औषध दिले जावे.
  4. बोकडांचे वजन दररोज वाढत असते अशा वेळेस कोणत्याही गोष्टीमुळे तणाव आल्यास वजनवाढ होणार नाही, यामुळे गोठ्यातील वातावरण , पाणी , चारा नियोजन, बसण्याची जागा या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे तरच तणावमुक्त वातावरणात शेळ्यांची चांगली वाढ होईल.

संकरिकरन करून किंवा विशिष्ठ जातीच्या शेळ्या पाळून आपल्याला कमीतकमी दिवसात जास्त वजन हे उद्दिष्ट गाठायचे आहे व त्यासाठीच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तरच आपल्या शेळीपालन व्यवसायाची सुरुवात चांगली होईल.
-डॉ. शैलेश मदने

67 Comments on “शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

Tejas prakashrao raut
जानेवारी 5, 2019 at 5:05 pm

Amhalasudha shelipalan karayache ahe krupaya yogya mahiti milali tar amhi shelipalan karu

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत