Close

ऑक्टोबर 16, 2017

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

 
आज वसुबारस आहे.  म्हणजे गोमातेची पूजा करण्याचा दिवस.  हा शुभ आणि साजेसा गोड मुहूर्त पकडून नवीन मूलभूत अशा लेखांची एक मालिका लिहिण्याचे प्रयोजन आम्ही केले आहे.  योगायोगाने वेबसाईट वरील पहिला वहिला लेख देखील १ बरोबर एक वर्षापूर्वी प्रसारित झाला होता.  एक वर्षात लाखो लोकांपर्यंत पॉवरगोठा.कॉम ही वेबसाईट पोचली आहे.
 
तरी पॉवरगोठा म्हणजे काय हा प्रश्न अनेकांना पडतो.
पॉवरगोठा ही एक चळवळ आहे, एक अत्युच्च ध्येय घेऊन ध्येयवेड्या तरुणांनी उभारलेली चळवळ !!  त्या चळवळीची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया. 
 
त्याबद्दलच ही लेख मालिका असेल.
 
 
 

संकल्पना

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
  • ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
  • जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
  • जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
  • जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
  • मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
  • तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे
  • कामगारांचे योग्य प्रशिक्षण झाले असून स्वच्छ दूध निर्मिती होते
  • अशा गोठ्याचा मालक अति कष्ट आणि अति खर्चातून मोकळा आहे, कितीही मोठा दुष्काळ आला तरी त्याचा गोठा तोट्यात जात नाही. दुधाचे दर कमी झाले तरी त्या मालकाला फरक पडत नाही.
  • गाई घेण्यात किंवा गोठा बांधण्यात भरमसाठ खर्च केलेला नसतो.
  • आणि असे बरेच मुद्दे
प्रत्येक गोष्टीबद्दल पुढच्या लेखांमधून सविस्तर चर्चा केली जाईल.  तत्पूर्वी थोडी पूर्वतयारी करून घेऊया. बॅकग्राऊंड तयार झाल्याशिवाय शो ला मजा येत नाही ना राव.

एक स्वप्न

सांगायची गोष्ट अशी की
 
 
“भारतातील साक्षरता वाढत आहे. उत्तम गोष्ट आहे. परंतु दरवर्षी लाखो-करोडो मुले दहावी-बारावी तसेच पदवीचे शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत आणि अर्थातच त्या सर्वाना पुरतील अशा आणि इतक्या नोकऱ्या नाहीत.  शेतीतील विश्वास तर अगोदरच उडाला आहे.  उत्पादन घेऊन देखील योग्य भावाची हमी नसलेने तो धंदा धोक्याचा आहे.  सर्वच जण तर डॉक्टर इंजिनीअर किंवा सरकारी नोकर तर बनू शकत नाहीत.  नोकरी ना मिळाल्यामुळे आणि उत्पन्नाचे दुसरेही साधन नसल्याने मग मोठ्या उमेदीने उच्च शिक्षण घेतलेल्या या मुलांना वैफल्य येऊ शकते.”
 
खूपच विदीर्ण वास्तव आहे.
 
आपल्याकडील शिक्षण पद्धतीमध्ये (ब्रिटिशकालीन वारसा किंवा लेगसी )  कौशल्य संवर्धन (skill-development स्किल डेव्हलपमेंट) चा मागमूसदेखील नाही.  पारंपरिक शिक्षणासोबत इतर व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे, त्याबद्दल प्रशिक्षण घ्यावे ही जाणीव देखील अजून १ टक्का सुद्धा रुजलेली नाही.
 
उद्योगधंद्यात, व्यापारात, बिझनेस मध्ये मात्र कुशल कामगारांचीच जास्त मागणी आहे. अकुशल कामगार म्हणजे ज्यांना एका रात्रीत काढून टाकू शकतो आणि ज्यांची जागा लगेच दुसरा कोणीतरी येऊ शकतो अशा कामगारांची डिमांड कमी आणि पुरवठा ज्यादा आहे.  म्हणूनच भारताचा व्यापार आणि मॅनुफॅक्चरिंग क्षेत्र देखील मागे आहे.  अकुशल कामगार कधीही बदलले जाऊ  शकतात आणि त्यांना पगार देखील तुटपुंजा असतो.
 
अशा वेळी करायचे काय ?
 
यातून मार्ग काय ?
 
माणूस तसे पाहता आळशी असतो, जे चालतेय ते चालू द्या. 
सर्व दरवाजे बंद होतात तेव्हाच तो जागा होतो आणि नवीन दरवाजा शोधू लागतो. 

पशुपालन व्यवसायातील संधी

आपल्याला उपलब्ध असलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे भारताची महाराष्ट्राची लोकसंख्या.   लोकसंख्या हे आपले बळ आहे, वीकनेस किंवा दुखरी बाजू नाही हे पहिल्यांदा जाणून घ्यायला हवे. (अर्थात हे बिझनेस साठी झाले, सोई सुविधा पुरवण्यामध्ये मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे अडचणी येतात. )
 
सर्व जग आपल्या मोठ्या बाजारपेठेचा हिस्सा काबीज करण्यासाठी तरसत आहे. आणि आपण मात्र त्याबद्दल अज्ञानी, उदासीन आहोत.
 
या वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांपैकी एखादी गरज भागविणारा एखादा उद्योग असेल तर ?  निश्चितच त्याला लवकर मरण नाही.  मग असा कोणता उद्योगधंदा आहे, ज्याचे उत्पादन सर्व लोक घेऊ शकतात आणि ते उत्पादन सर्व लोकांची एखादी गरज भागवितात ?
 
पॉवरगोठा टीम ने खूप विचार केला.  वाढत्या लोकसंख्येच्या खायच्या गरजा नेहमीच वाढत राहणार ! तेही असे उत्पादन जे रोज रोज खरेदी केले जाणार.  मग शेती, पशुपालन हे उद्योग लक्षात आले.  पण विविध कारणांमुळे शेती अडचणीत आहे.  पण आजपर्यंत शेतीपूरक उद्योग म्हणून बघितलेल्या पशुपालन उद्योगात मात्र भरपूर संधी आहेत.
महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकसंख्येला पुरण्यासाठी केवळ ३ कोटी लिटर दूध रोज उत्पादन होते. ३ कोटी हुन अधिक अंडी रोज लागत असताना महाराष्ट्रात केवळ १-१.५ कोटी अंडीच उत्पादन केले जातात, इतर गरज शेजारील राज्यांकडून आयात करून भागविल्या जातात.  शेळीच्या मटणाचं देखील तसेच आहे.
 
याचाच अर्थ मागणी जास्त आणि पुरवठा कमी ! आहे की हो संधी …. वरतून  स्थानिक उत्पादन  (लोकली प्रोड्युसड -locally produce goods) ही नेहमीच एक जमेची बाब असते.
 
शहरातील उच्चभ्रू मॉल्स मध्ये फिरलात तर असे लक्षात येईल की स्किम्ड आणि टोन्ड मिल्कला भरपूर दर मिळतो.  फ्लेवर्ड दूध – तेही फॅट काढून टाकलेले (टोन्ड किंवा स्किम्ड ) असे दूध भरपूर किंमतीला विकले जाते.  शहरातील लोक मॅक्डोनल्ड्स, डॉमिनोज, पिझ्झा हट इत्यादी परदेशी कंपन्यांच्या आउटलेट्स मधून भरपूर चीझ खात आहेत.  चांगले बॅक्टेरिया शरीरात जाऊन पोट तसेच आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रोबायोटिक किंवा योगर्ट (फ्लेवर्ड दही) खात आहेत. चीझ आणि योगर्ट तर जगातले सर्वात जास्त विकले जाणारे दुधाचे पदार्थ आहेत. 
 
अहो, मग दुधाचा धंदा बहरात पाहिजे होता ना ?
 
आमच्या टीम ला देखील असेच वाटले होते.  पण वास्तविकता थोडी वेगळी होती.  दूध-धंदा (दूध उत्पादक धंदा) तोट्यात होता – वर्षानुवर्षे ….
 
कोणताही व्यवसाय तोट्यात किंवा नफ्यात आहे का हे पाहायची एक साधी कसोटी आहे. एखादा धंदा यशस्वीरीत्या होताना पाहून अजून किती लोक त्याकडे आकर्षित होतात.
उदाहरणार्थ एखादे हॉस्पिटल जवळ एखादे मेडिकल चालू झाले आणि तुफान धंदा झाला तर लवकरच शेजारी २-३ अजून मेडिकल दुकाने येतात आणि त्याचा अव्वाच्या सव्वा नफा नॉर्मल पातळीवर आणून ठेवतात.
 
मग दूध, शेळी किंवा पोल्ट्री या धंद्यात असे आहे का ? नाही मुळीच नाही.
एखादा दूध- उत्पादक ५ गाईंवरून ५ वर्षात  २५ गाईंवर गेलेले उदाहरण फारच दुर्मिळ आणि त्याला पाहून त्याच्या गावात आणि शेजारील गावात तशाच प्रकारचे यशस्वी दूध उत्पादक पाहायला मिळणे म्हणजे एक जगातील आश्चर्य पाहायला मिळणे.  असे का होते बुवा ??
 
मग पॉवरगोठा टीम ने अभ्यास करायचे ठरवले.  काय कारणे आहेत अशी की अशी उत्तम संधी भरपूर मागणी असलेला धंदा तोट्यात आहे.  गेली सात वर्षे हा अभ्यास केला गेला. का महाराष्ट्राचे तरुण किंवा शेतकरी बंधू इतक्या नफेशीर (पोटेंशिअल potential  असलेल्या ) धंद्यातून नफा नाही कमवू शकत ??
 
तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या. त्यातील ठळक गोष्टी खालीलप्रमाणे, ज्या नक्कीच थोडी मेहनत घेतली तर त्यामध्ये सुधार आणता येऊ शकतो.

दुग्ध-व्यवसायातील अडचणी

१) या धंद्याबद्दल घोर अज्ञान
२) पारंपरिक पद्धतीने केला गेलेला व्यवसाय 
३) धंद्यातील उत्पादकाकडे इतर भागीदारानी (स्टेकहोल्डर्सनी stakeholders ) केलेले दुर्लक्ष
४) पतपुरवठा किंवा कर्जपुरवठ्यामधील मर्यादा
५) उदासीनता – इच्छाशक्तीचा अभाव
६) स्वप्न पाहिलेले नसणे
ही सगळी कारणे एक-एक करून पाहूया
 

१) या धंद्याबद्दल घोर अज्ञान

अज्ञान म्हणजे आचरणात आणण्यायोग्य माहितीचा अभाव. मग त्याला साधे अज्ञान म्हणा किंवा घोर अज्ञान ! घोर यासाठी म्हणतो आम्ही कारण खूपशा मूलभूत गोष्टीदेखील चुकीच्या झालेल्या असतात.
 
आपण वर्षानुवर्षे धंदा करतोय त्याच्या बारीक सारीक खाचा-खुणा आपल्याला माहित असल्या पाहिजेत.
 
दुधाचा धंदा तर सर्वस्वी गाय वेळेवर माजावर येऊन दरवर्षी गाभण राहणे, जास्त वेळा कालवडी होणे, गाईने विल्यावर भरपूर दूध देणे, गाय आजारीच न पडणे, खाद्याचे व चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन असणे, गोठ्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन असणे, इत्यादी मूलभूत गोष्टींवर अवलंबून आहे. त्या गोष्टींना अनुसरूनच पॉवरगोठा या संकल्पनेचा किंवा संज्ञेचा जन्म झाला आहे.
 
यातील जास्त कालवडी होणे ही एकच गोष्ट आपल्या हातात नाही. बाकी सर्व गोष्टी मॅनमेड man-made आहेत म्हणजेच आपल्या नियंत्रणाखाली आहेत. आणि योग्य व्यवस्थापनाने त्यात प्रगती देखील करता येते.
पण इथेच मूलभूत गोष्टींमध्ये माहितीचा व ती माहिती प्रत्यक्षात आचरण करण्याचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.
गाईचे जीवनमान (जैविक वर्तुळ Life Cycle) माहित नसणे, कालवड कधी भरवावी हे माहित नसणे, चारा व्यवस्थापनाबद्दल घोर अज्ञान, गोठ्यातील कुठल्या गाईने एका वर्षात एका वेतात किती दूध दिले हे माहित नसणे, फॅट किंवा SNF कमी लागून दर कमी मिळत असेल तर नक्की कुठल्या गाईमुळे ते कमी लागतेय हे माहित नसणे, मस्टायटिस (दगडी, कासदाह) अशा आजारांची माहिती नसणे (बरेचसे आजार प्रतिबंधात्मक उपायांनी १००% रोखता येतात), गोठ्याच्या हिशोबाच्या आणि गोपैदाशीच्या नोंदींचा पत्ता नसणे, in-breeding बद्दल अज्ञान इत्यादी गोष्टी सांगता येतील.
 
या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठीच तर पॉवरगोठा वेबसाईट चा जन्म झाला आहे. आणि आमचे प्रशिक्षण शिबीर देखील हीच माहिती पुरवण्याची कामे करतात.
 

२) पारंपरिक पद्धतीने केला गेलेला व्यवसाय

गेली कितीतरी वर्षे आपण एकाच पद्धतीने दुग्ध-व्यवसाय करीत आलोय. यात आजोबांनी वडिलांना आणि वडिलांनी मुलाला शिकवण्याचा भाग देखील नाही. बहुसंख्य रूढी, पद्धती केवळ निरीक्षणाने किंवा प्रॅक्टिसने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हस्तांतरित होतात.
 
गाईंना बंदिस्त गोठ्यात ठेवणे, त्यांच्या खराऱ्याची व्यवस्था नसणे, गोठ्याची जमीन ओली राहणे, स्वच्छता न राखणे, गोठ्यातील तापलेली हवा, चाऱ्याच्या अनियमित वेळा, तहान लागल्यावर पाणी प्यायला न मिळणे, जनावरांच्या आजारपणावर, शारीरिक कमतरतेवर, वंध्यत्वावर अंधश्रद्धात्मक उपाय, गैरसमजुती, मिनरल मिक्श्चर, कॅल्शिअम व इतर  सप्लिमेंट्स इत्यादी गरजेनुसार न देणे, पैदाशीच्या नोंदी न ठेवणे, एकच वळू सर्व पिढींना वापरणे, धार काढण्याच्या पारंपरिक पद्धती, मशीनच्या वापरबद्दल अज्ञान किंवा विरोध, मुरघासाबद्दल अज्ञान, एच एफ जर्सी गाईंबद्दल गैरसमज, त्यांच्या दूधाबद्दल गैरसमज, अति कष्ट, अति खर्च इत्यादी गोष्टी दूध धंद्याला मारक ठरतात.
 
पारंपरिक पद्धतीने गाई पाळणारा माणूस कायम गोठ्याला बांधला गेलेला असतो, शेण काढणे, वैरण पाणी करणे यात त्याचा खूप वेळ जातो आणि कोणतेही समारंभ, सुट्ट्या मनापासून उपभोगू शकत नाही.
 
यावर उपाय म्हणजे आधुनिकतेची कास धरणे, मुक्त गोठा – मुरघास शिकून अवलंब करणे ! स्वच्छ दूध निर्मिती कडे वाटचाल करणे
कसे ते आम्ही सांगतोच आहोत.

 

३) धंद्याच्या उत्पादकाकडे (दूध उत्पादक शेतकरी) इतर भागीदारांनी ( स्टेकहोल्डर्स – Stakeholders) केलेले दुर्लक्ष

विविध कारणांनी दूध धंद्यामध्ये दूध उत्पादकाला नफा कमी मिळत असला तरी, या धंद्याला (टर्नओव्हर -turnover) खेळते भांडवल व ढोबळ उत्पन्न खूप मोठे आहे. पैसा भरपूर फिरतो.
 
याचाच फायदा घेऊन धंद्यावर अवलंबून असणारे खाद्यपुरवठा धारक, औषध कंपन्या, डॉक्टर, दूध संघ इत्यादींनी भरपूर पैसे कमविले परंतु दूध-उत्पादकांना ते फायद्यात आणू शकले नाहीत.   दूध उत्पादकांची दिवसेंदिवस होणारी कुचंबणा फार थोड्या लोकांनी पाहिली.
 
काही ढोबळ वरवरचे प्रयत्न झाले, परंतु ते पर्याप्त नव्हते अपुरे होते.  त्यांना मर्यादित यश देखील मिळाले परंतु दुसरी धवल क्रांती होण्यासारखे काहीच घडले नाही.
 
शहरातील सरासरी दरडोई उत्पन्न वाढत गेले, त्यांचा खर्च देखील वाढला. पण त्या खर्चातील फार कमी अंश दूध-उत्पादकांपर्यंत पोचला.
दुधाचा दर वाढताच पशुखाद्य इत्यादींचा दर देखील त्या प्रमाणात वाढत गेला.
 
इतर सर्व भागीदारांनी दूध-उत्पादकांना बळकटी देण्यासाठी बळ  लावले असते तर कदाचित महाराष्ट्रसुद्धा डेन्मार्क किंवा न्यूझीलंड सारखाच दूध-उत्पादनात अग्रेसर असता.
 
असो.
 
ही शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी आता पॉवरगोठा टीम ने उचलली आहे.
 

४) पतपुरवठा – कर्जपुरवठा मधील मर्यादा आणि त्रुटी

पॉवरगोठा वेबसाईट तसेच फेसबुक पेज, व्हाट्सअप ग्रुप्स इत्यादींमधून सतत विचारला जाणारा क्रमांक २ चा प्रश्न म्हणजे आम्हांला कर्ज मिळेल का ? अनुदान मिळेल का? कसे आणि कुठून मिळेल ? गाई घेण्यासाठी शेड उभारण्यासाठी पतपुरवठा होईल का ?
 
होतकरू तरुण आणि सध्याचे पशुपालक या दोहोंकडून हा प्रश्न सर्रास विचारला जातो.
 
केंद्रशासन आणि राज्यशासन आपल्या पशुसंवर्धन विभाग तसेच NDDB  सारख्या संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी अनेक योजना राबवतात.  आताही विविध १०-२० योजना चालू आहेत. त्यासंबंधी माहिती त्या त्या विभागाच्या कार्यालयात, वेबसाईट वर तसेच माहितीच्या अधिकारातून उपलब्ध होत असते.
 
लाखो-करोडो रुपये वाटले देखील जातात. परंतु त्या योजना राबवताना जी काळजी घ्यावी लागते, पार्श्वभूमी (बॅकग्राऊंड ) तयार करावे लागते, त्याचा अभाव असल्याने लाखो रुपये पाण्यात जातात, लाखो रुपये शासकीय तिजोरी मध्ये पडून देखील राहतात.
 
तसे पाहता इतर कोणत्याही धंद्यापेक्षा दूध-धंदा अतिशय नाजूक आहे. गाई आजारी पडल्या, दगावल्या, गाभण नाही राहिल्या, चाऱ्याचे नियोजन नसेल, तर हमखास अतोनात नुकसान होते.  कर्ज अनुदान घेऊन धंदा चालू करणाऱ्या बहुतांश लोकांकडे या ज्ञानाचा अभाव असतो. आणि ते सुरुवाती (day one) पासूनच तोट्यात जातात. त्यांच्याकडून कर्जाची परतफेड होत नाही.
 
अशा रीतीने बहुतांश कर्जे थकीत झाल्याने बँकांचा दूध धंद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, नकारात्मक होतो. नवीन कर्जे देताना बँका आणि बँकर्स का-कु करतात. थेट मना केले जाते.
कर्ज मिळविण्यासाठी कोणती पूर्वतयारी केली जाते, कशाप्रकारे अकाउंट मेंटेन केले पाहिजे, याचे ज्ञान नसल्याने देखील कर्ज मिळविण्यात अडचणी येतात.
 

५) उदासीनता – इच्छाशक्तीचा अभाव

केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे ।।
ही म्हण तुम्ही ऐकली असेलच ! कुठल्याही धंद्याला, व्यवसायाला आणि त्यात मिळणाऱ्या यशाला ती लागू होते.
आपण क्रमांक एक च्या कारणामध्ये अज्ञानाची चर्चा केली. वास्तविक पाहता दूध धंद्याबद्दलचे ज्ञान कृषी विज्ञान केंद्रे, युट्युब, गुगल च्या माध्यमातून किंवा जे मोजके यशस्वी दूध उत्पादक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष उपलब्ध आहे.
 
महाराष्ट्रात २०-३० लाख एच एफ तसेच संकरित जर्सी गाई आहेत, ३-४ लाख खिल्लार जनावरे, आणि ४० एक लाख non-descript म्हणजे जात सांगता न येणाऱ्या गाई आहेत.  तितक्याच म्हैशी पण आहेत.   प्रति माणसी २-३ जनावरे आहेत.  प्रति जनावर दूध पहिले तर फक्त ३-४ लिटरच आहे.
 
११ कोटी लोकसंख्या पाहता मागणी तर भरपूर आहे, परंतु इच्छाशक्तीचा अभाव असलेने दूध उत्पादकांची आधुनिकतेकडे वाटचाल फारच धीम्या गतीने चालू आहे.
 
कर्जपुरवठा, शासकीय योजना उपलब्ध असल्या तरी, ते मिळवण्यासाठी जी मेहनत लागते, त्यातील क्लिष्टपणावर विजय मिळवावा लागतो. त्याबद्दल चिकाटी फारच थोड्या लोकांमध्ये पाहायला मिळतो. उत्साहाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. कोणीतरी रेडिमेड यावे आणि मला गाई आणि भांडवल सुद्धा हातात देऊन जावे अशीच मनीषा असलेले बरेच जण आहेत.
 
मात्र अशा उदासीनतेमुळे धंद्यातील नुकसानीसाठी बाहेर बोट दाखविण्याची वृत्ती बळावते. मग शासन, दूध संघ किंवा खाद्य विक्रेत्या कंपन्या रोषास पात्र होतात.
 
दूध धंद्यात पैसे बक्कळ असला तरी त्याला थोडा वेळ लागतो. ५ च्या २५ गाई होण्यासाठी ५ वर्षे लागतात.  व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थापन असलेले बरेचसे पशुपालक नफ्यात आहेत .  ते १ गाईवरुन २५ गाईवर गेले आहेत.  अशी काही मंडळी आहेत, जे उत्तम दुग्ध-व्यवसाय करत आहेत.  मग सर्वच जण का नाही करू शकत ?? 
 
आम्ही फेसबुकवर सर्व्हे करण्यासाठी काही मूलभूत प्रश्न विचारले होते.
१) दूध धंदा फायद्याचा आहे का ? या प्रश्नाला 207 लोकांनी उत्साहात उत्तरे दिली, बहुसंख्य लोकांनी होकारार्थी उत्तर दिले.  कसा काय फायद्यात येऊ शकतो याबद्दल देखील बऱ्याच लोकांनी ज्ञान दिले.
२) तुमचा दूध धंदा फायद्यात आहे का ? आधीच्या प्रश्नाला थोडी बगल देऊन हा प्रश्न विचारला होता. आता ८३ लोकांनी फक्त उत्तरे दिली. त्यातील बहुसंख्य लोकांनी नकारार्थी उत्तरे दिली.
३) तुमच्याकडील गाईंची संख्या २०१० आणि २०१७ मध्ये किती किती होती ? हा तिसरा प्रश्न होता. प्रत्येक प्रश्नागणिक खोलात शिरण्याचा आमचा प्रयत्न होता.  उत्तर देणाऱ्यांची संख्या रोडावली. केवळ ५० लोकांनी उत्तरे दिली. त्यातील फार थोड्या लोकांचे २०१० मध्ये कमी आणि २०१७ मध्ये जास्त गाई होत्या (उदाहरणार्थ २०१० मध्ये ६ आणि २०१७ मध्ये २२)
४) तुमच्याकडे मुरघास आहे का ?  या प्रश्नाला फक्त २४ उत्तरे मिळाली.
जसजसे खोलात शिरत होतो, उत्तरे कमी होत गेली त्यामुळे पॉवरगोठा टीम ने अजून प्रयत्न केले नाहीत.
 
अर्थात ९९.९९% पशुपालक फेसबुक वर नाहीत हा भाग वेगळा तरी थोडाफार अंदाज लागावा म्हणून हा प्रपंच केला.
 
यातून हे मात्र स्पष्ट झाले की, दूध धंद्याबद्दल थोडी फार माहिती असलेले बाहेरून लक्ष ठेवणारे बरेच लोक आहेत. परंतु मेहनतीने, बारकावे जाणून घेऊन आधुनिक पद्धतीने योग्य दिशेने वाटचाल करणाऱ्यांची संख्या फारच मर्यादित आहे. इच्छाशक्तीचा अभाव आणि उदासीनता ठळकपणे दिसून येते.
 
ही उदासीनता बदलण्याचा प्रयत्न देखील अव्याहतपणे चालू आहे.
 

६) स्वप्न पाहिलेले नसणे

आता तुम्ही म्हणाल हे काय ?
 
स्वप्ने काय पाहायला लावता ?
 
तुमचीच म्हण तुम्हाला माहित नाही का ? केल्याने होत आहे रे
 
थांबा
 
स्पष्ट करू द्या
 
एखादी गोष्ट प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्या गोष्टीचे मनात एक चित्र तयार होणे फार महत्वाचे आहे. चित्रकार जेव्हा चित्र काढतो, किंवा लेखक एखादा लेख लिहितो तेव्हा त्या कलाकृतीची उजळणी हजारो वेळा त्याच्या मनात झालेली असते.
 
आजपर्यंत कोणी या धंद्यात किंवा शेतीत देखील गेली ४०-५० वर्षे पैसेच पहिले नसल्याने ते स्वप्न पाहणे ( ज्याला इंग्लिश मध्ये Visualization विझुएलायझेशन म्हणतात) अवघड होऊन बसले आहे.
 
हे स्वप्न पाहण्यासाठी युट्युब गुगल वर आधुनिक गोठे पाहणे, प्रत्यक्ष चांगले गोठे पाहणे आपले धंद्यातील ध्येय लिहून काढणे इत्यादी गोष्टी करू शकता.  तसे तर टीव्ही चॅनेलवर यशोगाथा दाखविल्या जातात परंतु धंद्यातील बारकावे सांगितले जात नसल्याने आपणसुद्धा या गोष्टी करू शकू हा विश्वास बघणाऱ्याच्या मनात निर्माण होत नाही.
 
दूध धंदा यशस्वीपणे करण्यासाठी देखील यशस्वी दूध धंद्याचे, यशस्वी गोठ्याचे, निरोगी गाईंचे आणि बँकेत जमा झालेल्या पैशांचे स्वप्न रंगविणे अतिशय जरुरी आहे.
 
अशा हजारो लाखो यशस्वी गोठ्यांचे म्हणजेच पॉवरगोठ्यांचे स्वप्न आमच्या टीम ने पहिले आहे.  ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करण्याची आमची तयारी आहे.
 
आम्ही येत आहोत, पूर्ण तयारीनिशी !!
 
 
तुम्ही तयार आहात का ?
 
 

 

तळटीप, सूचना आणि विनंती:

तुम्ही हा लेख वाचताय आणि शेवटपर्यंत वाचलाय याचा अर्थ २-३ गोष्टी स्पष्ट होतात.
तुम्हाला दूध धंद्याबद्दल कुतुहूल आणि उत्सुकता किंवा आपुलकी आहे.  याविषयी अधिक ज्ञान मिळविण्याची इच्छादेखील आहे.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञान मिळवण्याचे सर्वोत्तम साधन इंटरनेट चा खजाना तुमच्या कडे मोबाईल किंवा कॉम्पुटर च्या रूपात उपलब्ध आहे. ते कोणत्या पद्धतीने वापरायचे हे देखील माहित आहे.
 
परंतु आधीच सांगितल्या प्रमाणे बहुसंख्य लोक पशुपालक ९९ % पशुपालक फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट, वेबसाईट पासून बरेच दूर आहेत. हे आम्हाला वेबसाईट लाँच केल्यापासून बरेचदा लक्षात आले आहे.
 
यापुढचा लेख तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्हाला खालील गोष्टी केल्या पाहिजेत.
 
१) या लेखाची लिंक फेसबुक वर तसेच व्हाट्सअप वर शेअर करा.
 
२) आपल्या गावात ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा कॉम्पुटर मोबाइल, व्हाट्सअप नाही अशा कमीत कमी १० लोकांना हा लेख तुमच्या मोबाईल वर वाचायला द्या. त्यातून आलेला अनुभव आम्हाला कळवा .  लेखाखाली कमेंट्स सेक्शन मध्ये प्रतिक्रिया कळवा. 
 
३) आपल्या गावात दुग्ध-व्यवसाय, मुक्त गोठा, चारा व्यवस्थापन अन मुरघास निर्मिती प्रात्यक्षिक या विषयांवर पॉवरगोठाचे मोफत प्रशिक्षण आयोजित करा. त्यासाठी २०-३० लोक जमवून पॉवरगोठा टीमशी 9112219612/9112219603 येथे संपर्क करा किंवा [email protected] .com येथे ई-मेल करा.  तुम्ही आमच्या फेसबुक पेज वर किंवा व्हाट्सअप ग्रुपवर सुद्धा आम्हाला कळवू शकता.   १००० गावात पोचण्याचा आमचा मानस आहे.   
 
सर्वांकडे माहिती आणि कौशल्य आल्याशिवाय बरकत नाही.
 
एकमेका साहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ।।
 

37 Comments on “पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

Hire Rajendra Tryambak
ऑक्टोबर 14, 2018 at 6:37 am

Chan mahiti hotkaru lokana nakkich prerna milel

उत्तर
Somanath Pasale pandharpur
सप्टेंबर 3, 2018 at 3:28 am

Madane sirancha contact no hawa ahe

उत्तर
Sachin bhalerao
जुलै 30, 2018 at 4:07 am

Sir म्हैस palnavishayi माहीती द्यावी

उत्तर
vishal kolekar
जून 22, 2018 at 8:18 am

mast sir tumcha lekh mi vachla
ha vyavsay mala dekhil karaycha aahe matr thodkyat asnara paisa
sir mla sangnyacha hetu asa aahe kay maj gav dongravarti aahe tr mi ha vyavsay karu shakto ka ase brech prashn aahet mi tumchya barobr call vr boltoch

उत्तर
Akshay Vilas Mugulkhod
मे 29, 2018 at 4:12 am

sir , khup changli mahiti diliye tumhi . aatachya sarw nawin mulana wyasay kartana yacha khup upayog hoil.tumhi asech margadarshan karat raha.

उत्तर
sarjerao bhagavan bandgar
मे 25, 2018 at 8:58 am

धन्यवाद सुंदर लेख

उत्तर
shivanand bhadargade
एप्रिल 6, 2018 at 7:56 am

Khup Chan Kam karit Aahat aapan ..apan dileli mahiti majyasathi khup mahatwachi ahe
mi modern dairy farm suru karaycha wichar kartoy
tyasathi aplyakade ankhi kahi mahiti asel tr pls Mala Kalwa.
thank you
shivanand

उत्तर
Amol kaware
मार्च 28, 2018 at 2:22 am

Khup Chan Kam karit Aahat aapan ..
Lots of thanks

उत्तर
Waghambar Shelke
मार्च 26, 2018 at 7:35 pm

Thank You For overall information

उत्तर
Amesh Pawar
फेब्रुवारी 26, 2018 at 10:06 am

Good and useful information, i always thankful to you. Please inform us about Kadaknath Poultry Farming.

उत्तर

Hire Rajendra Tryambak साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत