Close

जुलै 23, 2018

दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

Dairy Farming in Low rates

दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात.  जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि सध्या तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर आले आहेत.  शासन निर्णयाप्रमाणे दर अजून लागू झाले नसल्यास अजूनही 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत आहे.

मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय धंदा करायचा बाबानू ?

घरचा असला तरी काय झालं – चारा फुकट मिळत नाही. लेबर चा पगार तर द्यावाच लागतो की.  लय भारी मॅनेजमेंट केला, तरी गाय आजारी पडल्यावर डॉक्टर बोलवावाच लागतो की.

मदत म्हणून खाद्य कंपन्या किंवा औषध कंपन्यांनी दर कमी केल्याचे तर अपेक्षित नाही.  बरं चेरमन वेळेवर पगार भी देईना झालाय. इतका तोटा सहन करून आम्ही तर कुठलेच हफ्ते फेडू शकत नाही.  धंदा करायचा तरी कसा ? जग जिंकणे यापेक्षा सोपे असावे.

 

” वादळ आणि जोराचा पाऊस चालू असेल तर खाली मान घालून आडोशाला जाऊन जीव वाचवावा. पाऊस थांबणारच आहे कधी ना कधी!!! “

 

मला एक किस्सा आठवतो, सचिन तेंडुलकर किंवा वीरेंदर सेहवाग इंग्लंड मध्ये डावाची सुरुवात करताना आणि ढगाळ वातावरण, हिरवीगार खेळपट्टी अशा स्विंग गोलंदाजी ला अनुकूल आणि फलंदाजी ला प्रतिकूल परिस्थितीत पहिले १-२ तास गोलंदाजाला देत. आपल्या सर्व तलवारी म्यान करून ऑफस्टंम्प बाहेर चे चेंडू सोडून देत असत.

 

नंतर एकदा ऊन पडले, आणि सराव झाला की हल्लाबोल.  परंतु तोपर्यंत विकेट पडू न देणे हेच लक्ष. त्या पहिल्या तासांत विकेट पडून खूप सारे सामने आणि मालिका भारताने परदेशात गमावल्या आहेत.  

 

जे क्रिकेट आणि त्यातील गोलंदाजांच्या वर्चस्वाचे आहे, तसेच दूध-धंद्याचे दुधाच्या दरांचे आहे शेतकरी मित्रांनो.

 

ढोबळमानाने पाहता अशा परिस्थितीत सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांपैकी कोणालाच दूध धंदा परवडू शकत नाही.

 

बोटांवर मोजण्याइतके शेतकरी असतील ज्यांना नफा नव्हे परंतु ना नफा-ना तोटा इतका तरी दूध धंदा परवडत असेल.

 

बाकीचे बहुतांश शेतकरी अशा परिस्थितीत हताश होतात, धंद्याला किंवा सरकारला दोष देतात. मनाचा धीर सुटून खच्चीकरण होते. काही लोक धंदा बंद करतात, गाई विकतात. काहींना तसे करणे अपुऱ्या भांडवलामुळे आणि इतर परिस्थितीमुळे भाग पडते.    

 

पण दूध दर कमी असताना देखील कसा धंदा परवडू शकतो ते आम्ही सांगतो. वॉटरप्रूफ मोबाईल असतो त्याप्रमाणे आपला धंदा दरप्रूफ कसा करायचा ते आम्ही सांगतो.

 

२-३ पद्धती आहेत.

 

 • कमी दर असताना धंद्यात टिकून राहणे डॅमेज कंट्रोल:  नफा होत नसला तरी, दूध दर कमी झाल्यावर कमीत कमी खर्चातून उत्पन्न काढून जीव वाचवणे.
 • विमा/इंन्शोरन्स : दूध दर जसे खाली आले तसे ते पुन्हा वाढणारच आहेत. तुमचा धंदा आणि गोठा व्यवस्थापन इतके चांगले असावे की, दूध दर चांगले असताना इतका नफा झाला पाहिजे की शिल्लक भरपूर राहिली पाहिजे. जी शिल्लक चुकून पुन्हा दर कमी झाले तर तुम्हाला तरुन नेईल.  धंद्याचा विमा किंवा इंन्शोरन्स काढल्यासारखे काम, तुम्ही दर चांगले असताना केले पाहिजे.
 • स्वतःची विक्री व्यवस्था (डिस्ट्रिब्युशन

 

यातील पहिले २ उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या धंद्यात नक्की खर्च कुठे होतो आणि उत्पन्न कशा कशावर अवलंबून आहे हे माहित पाहिजे. त्यासाठी तुम्ही धंद्याच्या नफ्या-तोट्याचा अभ्यास केला पाहिजे.  १ लिटर दूध उत्पादन करण्यासाठी नक्की किती खर्च येतो, हे काढले पाहिजे. हे काढण्यासाठी नोंदी केल्या पाहिजेत. नेमक्या नोंदी कोणत्या आणि सोप्यात सोप्या पद्धतीने, वही न हरवता, बँक सुद्धा सहज कर्ज देईल अशा पद्धतीने नोंदी करणे साठी पॉवरगोठा रोजनिशी म्हणजेच ऑनलाईन रेकॉर्ड बुक तुम्हाला मदत करते.  तुम्ही अजून घेतले नसेल तर नक्की त्याची ट्रायल करू शकता.

 

# कमी दर असताना धंद्यात टिकून राहणे डॅमेज कंट्रोल

तुमचा गोठा पॉवरगोठा असेल तर नक्कीच तुम्ही धंद्यात प्रतिकूल परिस्थितीत देखील टिकून राहता. पॉवरगोठ्याच्या संहितेमध्ये काय काय येते – हे पॉवरगोठा म्हणजे काय ?  या लेखात तुम्ही वाचले असेलच.

 

पॉवरगोठा एक असा गोठा असतो,

 • ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
 • जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
 • जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
 • जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
 • मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
 • तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे
 • कामगारांचे योग्य प्रशिक्षण झाले असून स्वच्छ दूध निर्मिती होते
 • अशा गोठ्याचा मालक अति कष्ट आणि अति खर्चातून मोकळा आहे, कितीही मोठा दुष्काळ आला तरी त्याचा गोठा तोट्यात जात नाही. दुधाचे दर कमी झाले तरी त्या मालकाला फरक पडत नाही.
 • गाई घेण्यात किंवा गोठा बांधण्यात भरमसाठ खर्च केलेला नसतो.

मुख्य गोष्टींचा पुन्हा एकदा खाली उजाळा करूया आणि त्या गोष्टी कमी दूध दर असताना कशा मदतनीस ठरतात ते पाहू.

 

त्या कोणत्या ५ गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्या धंद्यावर प्रतिकूल परिस्थितीत देखील परिणाम होणार नाही ?

#१ जातिवंत, निरोगी गाई

जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात.  ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळणे परवडते

आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.

#२ चारा  व खाद्य नियोजन

एखाद्या सहलीला जाण्यापूर्वी जसा टूर्स आणि ट्रॅव्हल्स वाले पूर्ण कार्यक्रम तयार ठेवतात, जेणेकरून सहभागी लोकांना सहलीदरम्यान अडचण येणार नाही. तसेच कोणताही धंदा चालू करण्यापूर्वी त्यातील कच्चा मालाचे तसेच खेळत्या भांडवलाचे आधीच नियोजन करावे.  

आपल्या धंद्यातील मुख्य कच्चा माल म्हणजे हिरवा चारा आणि पशुखाद्य.  याचे प्रमाण म्हणून एका खऱ्या गोठ्यातील एका महिन्याचा खर्च आपण खाली पाहू शकता,  

नमुना खाद्य खर्च

नमुना खाद्य खर्च

वरील आलेख पाहिल्यास लक्षात येईल की, सर्वात जास्त खर्च हिरवा चारा आणि पशुखाद्यावर होतोय.  आता प्रत्येक गाईस, कालवडीस चारा व पशुखाद्य मोजून टाकणे आवश्यक आहे. पॉवरगोठ्यातील चारा गाईंनी न खाल्ल्यामुळे वाया जात नाही, तसेच कमी पडल्यामुळे गाईंचे पोट अपूर्ण भरले अशी वेळ येत नाही.  नेमका चारा व पशुखाद्य टाकल्याने अति खर्च होत नाही. ( तुमच्या गोठ्यातील खर्च आणि उत्पन्नाचे नेमके आकडे जाणून घ्यायचे असतील तर पॉवरगोठा नोंदवही तुमच्यासाठी आहे. )

कमी दर असताना चाऱ्यावर अधिक खर्च करणे नामुष्कीचे होऊन बसते. परंतु, त्या चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन आधीच तयार केले असेल,  तर चारा शोधात इकडे-तिकडे फिरावे लागत नाही. कमी दर असताना देखील तुमचा कच्चा मालाचा खर्च (इनपुट कॉस्ट) एकसमान राहतो. कमी दराच्या वेळी, ते भांडवल तुम्ही खाद्य किंवा औषधी खर्चासाठी वापरू शकता.   

म्हणून जेव्हा चारा आणि पैशाची उपलब्धता असेल तेव्हा एकदाच वर्षभरासाठी लागणारा हिरवा चारा मुरघास स्वरूपात, खड्ड्यात, बॅगेत किंवा बांधकामात भरून ठेवावा.  मुरघास निर्मिती ची माहिती येथे वाचा.  — > 

मुरघास निर्मिती -१ 

मुरघास निर्मिती -२ 

महत्वाची सूचना: दर कमी झाले म्हणून पशुखाद्या वरील खर्च कधीही कमी करू नये.

योग्य प्रतीचे दूध तयार होण्यासाठी पशुखाद्य योग्य प्रमाणात खाऊ घालणे अतिमहत्त्वाचे आहेत. पशुखाद्या वर योग्य खर्च काय आहे हे ठरविणे साठी वर्षभर प्रतिगाय किती खाद्य लागते हे त्या गाईच्या दूध देण्याच्या क्षमतेवरून ठरते.   पशुखाद्याची मात्रा, प्रमाण प्रत्येक गाईमागे वेगळी आहे. नक्की कोणत्या गाईला किती पशुखाद्य लागते ते प्रयोगातूनच समजून येईल. योग्य प्रमाणात पशुखाद्य टाकल्यास, पशुखाद्यावरील खर्च वाया जात नाही. कमीत कमी खर्चात दूध तयार होते.  आणि प्रतिकूल परिस्थितीत धंद्यात टिकून राहणे शक्य होते.

गोठ्याची योग्य संरचना

गोठ्यात योग्य रीतीने कप्पे केलेले असल्यास नक्की कोठे, कोणत्या गाईवर किती खर्च होतोय हे काढणे सोपे जाते. योग्य संरचना जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा  – गोठ्याची योग्य संरचना

#३ मुक्त, स्वच्छ आणि कोरडा गोठा

पॉवरगोठा चे नियमित वाचक असाल तर, मुक्त गोठ्याची महती तुम्हाला माहित असेलच.  

बंदिस्त गोठ्यातील, ओलावा, उन्हाळ्यात पत्रा तापल्यानंतर मारणारी धग – त्यामुळे हवणाऱ्या गाई या सर्व कारणांमुळे बंदिस्त गोठ्यातील गाई तणावात असतात आणि त्यांच्या क्षमतेपेक्षा खूप कमी दूध देतात. कमी दूध म्हणजे कमी उत्पन्न.  आणि खर्च तसाच राहिल्यामुळे दूध दर कमी असताना बंदिस्त गोठ्याला जास्त आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. गाई आजारी देखील वारंवार पडतात त्यामुळे डॉक्टर तसेच औषध खर्च तसेच दगडी किंवा इतर आजारपणामुळे होणारी दुधात घट, तोट्यात भर घालते.

मुक्त गोठ्यातील गाई बंदिस्त गोठ्यापेक्षा कितीतरी स्वस्थ आणि आनंदी असतात.  मुक्त गोठ्यात गाई सहसा आजारी पडत नाहीत. शेण साफ करणे, गाई धुणे, खरारा करणे इत्यादी कामे वाचल्यामुळे कामगार खर्चात बचत होते.  ४ ते ५ लिटर पाणी दुभत्या गाईच्या पोटात गेल्यानंतर कासेत १ लिटर दूध तयार होते म्हणूनच गाईला गरजेप्रमाणे पाणी देणे अत्यावश्यक आहे. मुक्त गोठ्यात पिण्यासाठी २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध असते.

या सर्व कारणांमुळे मुक्त गोठ्यात बंदिस्त गोठ्याच्या तुलनेत अधिक दूध उत्पादन मिळते.  दूध भरपूर मिळाल्याने उत्पन्नात तुलनात्मक वाढ होते.  मुक्त गोठ्याची अधिक माहिती येथे वाचा 

 

#४ स्वच्छ दूध निर्मिती

स्वच्छ दूध म्हणजे काय ?

 • पाणी किंवा इतर पदार्थांची भेसळ नसलेले,
 • अफ्लाटॉक्सिन विरहित  
 • अँटिबायोटिक / प्रतिजैविकांचा अंश नसलेले,
 • सोमॅटीक पेशी कमी असलेले,
 • जिवाणूंची संख्या कमी असलेले दूध

म्हणजे स्वच्छ दूध होय.  

स्वच्छ दूध निर्मिती कमी दूध दर असताना कशी मदत करू शकेल ??

बरेचसे दूध संघ स्वच्छ दुधाला वेगळा आणि जास्त दर देतात हे तुम्हाला ठाऊकच असेलच.  साहजिकच कमी दूध दर असताना स्वच्छ दूधनिर्मिती करणारा पॉवरगोठा तुलनेने कमी तोट्यात जातो.  तसेच तुम्ही थेट विक्री करत असाल तर हे स्वच्छ दूध तुमची मार्केटिंग करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावते.  

दूध आणि दुधाचे पदार्थ खूप प्रमाणात न खपण्याचे मुख्य कारण आहे दूध आणि दुग्ध-जन्य पदार्थांमधील भेसळ किंवा भेसळीची ग्राहकांना असलेली शंका होय.  आजकालच्या कँसर सारख्या दुर्धर रोगांच्या युगात एखाद्या गोठ्यातून गॅरंटी असेलले भेसळ मुक्त, स्वच्छ दूध उपलब्ध असेल तर ग्राहक पहिली पसंती अशा दुधालाच देतील.  आणि त्या गोठ्याचे उत्पन्न नेहमी वाढतच राहील.

स्वच्छ दूध करण्यासाठी काय काय लागेल ?

 • निरोगी, तणावमुक्त गाई
 • मुक्तसंचार गोठा
 • दूध काढण्याची योग्य प्रक्रिया
  • स्वच्छ भांडी
  • स्वच्छ हात
  • स्वच्छ दूध काढणी यंत्र (मिल्किंग मशीन )
  • स्वच्छ गोठा
  • स्वच्छ संकलन आणि विक्री व्यवस्था
  • पूर्व – डीप – पश्चात डीप ( प्री-डीप आणि पोस्ट – डीप )

मिल्किंग मशीनचा वापर : आधुनिकतेची कास

मिल्किंग मशीनचा वापर केल्याने कामगार खर्चात बचत तर होतेच. उत्तम दर्जाच्या मिल्किंग मशीन मुळे गाई तणावमुक्त आणि आनंदी राहतात.  कामगारांच्या हातांच्या स्वच्छतेचा प्रश्न मिल्किंग मशीन च्या वापरामुळे सुटतो.

 

प्रशिक्षित कामगार : आधुनिकतेची कास

तुमच्या धंद्यातील पक्का माल  म्हणजे दूध ! ते कासेतून निघाल्यापासून दूध संघात संकलित होईपर्यंत रोज कामगारांद्वारे हाताळले जाते.   कामगारांना स्वच्छ दुधाचे महत्व आणि स्वच्छ दूध काढण्याची प्रक्रिया याची योग्य माहिती असेल तरच एखाद्या गोठ्यात सातत्यपूर्ण रित्या उच्च दर्जाचे स्वच्छ दूध तयार होऊ शकते.  नाहीतर मालकाच्या गैरहजेरी मध्ये कामगारांकडून दुर्लक्ष झाल्याने दुधाचा दर्जा घसरू शकतो.

 

म्हणूनच स्वच्छ दूध निर्मिती करायची असेल तर कामगार प्रशिक्षण होणे महत्वाचे आहे.  आमच्या मते, तुम्ही स्वतः आणि तुमच्या गोठ्यातील सर्व कामगारांचे योग्य प्रशिक्षण एकदा तरी होणे गरजेचे आहे.

#५ गोठ्याच्या प्रगतीपुस्तकावर मालकाचे लक्ष

क्रिकेट मध्ये डाव खेळताना जिंकण्यासाठी नेमक्या किती धावा काढायच्या या माहित असतील तर खेळणे सोपे जाते.  म्हणून खेळपट्टी, हवामान, प्रतिस्पर्ध्याची ताकद इत्यादी गोष्टीवर बारीक अभ्यास करून प्रशिक्षक आणि कप्तान एक धोरण ठरवून खेळतात.

तुमच्या गोठ्यात दूध दर अधिक असताना नेमका किती नफा होत होता, आणि दूध दर कमी असल्याने नेमका किती नफा/किंवा तोटा होतोय हे माहित असेल तर प्रतिकूल परिस्थितीत खच्चीकरण होत नाही.  

 • नेमका पैसे कुठे खर्च होतोय,
 • चाऱ्यावरील खर्चात कशी बचत करायची,
 • कोणत्या गाईला किती पशुखाद्य लागते,  
 • औषधांवर किती खर्च होतोय,
 • वर्षभर प्रत्येक गाईने किती दूध दिले
 • कमी दूध देणाऱ्या/सतत आजारी पडणाऱ्या गाई विकायच्या का ?

इत्यादी प्रश्नांची उत्तरे नेमकी माहित असली तर गोठ्याचा मालक दूध दर कमी असताना देखील हताश होत नाही.  दूध अधिक असताना जास्तीत जास्त नफा कमवून तो कधीतरी येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीची तयारी करतो.

वरील सर्व आकडे नेमके माहित करून घ्यायचे असतील तर पॉवरगोठा रोजनिशी तुम्हांला मदत करेल.

 

#विमा/इंन्शोरन्स :

विमा म्हणजे एखाद्या क्वचित घडणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीसाठी आपत्कालीन नियोजन करणे.  नुकसान कमी करणे, किंवा त्याची भरपाई करणे.

 

बर्फाळ प्रदेशात राहणारे लोक, बर्फ पडण्यापूर्वी भरपूर अन्नधान्याचा आणि गरजेच्या वस्तूंचा भरपूर साठा करून ठेवतात. त्यामुळे त्यांना अति-प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्थलांतर करण्याची गरज भासत नाही.

 

तुम्ही जर तुमच्या दूध धंद्याचा इन्शोरन्स करून ठेवला असेल तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीत धंदा बंद करून नोकरी कडे किंवा दुसऱ्या धंद्यात स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.

 

नाही आम्ही इंशुरन्स कंपनी कडे जाऊन खरोखरच विमा बद्दल नाही बोलत आहोत. गाईंचा खरोखरच विमा तर उतरवीलाच पाहिजे. पण धंद्याचा विमा उतरवण्यासाठी खालील गोष्टी करा.

 

 • कमी दूध दर असताना धंदा करण्याच्या वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी
 • भांडवलाचे योग्य नियोजन

नफ्यात असताना अतिरिक्त नफा किंवा  त्यातील काही भाग भविष्यातील भांडवल म्हणून काढून ठेवावा.

दूध धंद्यातील नफा-तोटा योग्य रीतीने मोजण्या आणि मांडण्यासाठी हा लेख वाचा 

#स्वतःची विक्री व्यवस्था (डिस्ट्रिब्युशन) :

 

दूध संघास दूध घालण्यापेक्षा अर्थातच स्वतः दूध विक्री करणे अधिक अवघड आणि अधिक खर्चाचे आहे.

 

स्वतः दूध विक्री करण्यामध्ये मार्केटिंग – ग्राहकांना तुमच्या दुधाची माहिती पोचवणे , आणि वितरण डिस्ट्रिब्युशन म्हणजे ग्राहकापर्यंत तुमचे दूध रोज पोचवणे या २ प्रमुख गोष्टींचा समावेश होतो.  अति नाशवंत माल असल्याने दूध वितरण व्यवस्था थोडी जिकिरीची असते.  सर्व बाजूनी विचार केल्यास शक्यतो दूध संघांनाच तुमचे दूध घालण्याचा पर्याय सोयीस्कर आहे. 

 

स्वतः ची विक्री व्यवस्था करण्याबद्दलचा माहितीपूर्ण लेख आम्ही लवकरच प्रसिदध करू.

 

या लेखाबद्दल तुम्हाला काय वाटले हे कमेंट/प्रतिक्रियांद्वारे किंवा इमेलद्वारे आम्हाला कळवा.

6 Comments on “दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

प्रविण कोइगडे
जानेवारी 29, 2019 at 4:09 pm

मी प्रविण कोइगडे,कोल्हापूर मध्ये रहातो.मला 10 गायी चा गोठा करायचा आहे.कृपया consulting कराल का.

उत्तर
Dnyaneshwar wagh
जानेवारी 23, 2019 at 4:18 pm

उपयुक्त अशी माहिती !!
दूध डिस्ट्रिब्युशन बद्दल कृृपया माहिती देणे !!

उत्तर
किरण पाटील
ऑक्टोबर 2, 2018 at 9:40 am

आम्हला सतर्क केल्या बद्दल धन्यवाद,तुमच्या माहिती मुळे बऱ्याच चुका टाळता येतील

उत्तर
Jairam loke
सप्टेंबर 18, 2018 at 4:50 am

चांगली माहिती आहे

उत्तर
शरद पवार
ऑगस्ट 28, 2018 at 5:19 pm

चारा किती आणि कसा द्यायचा

उत्तर
Pradeep Shinde
जुलै 23, 2018 at 7:44 am

खूपच छान माहीती आहे सर या माहीती मुळे नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनात तयार झाली
आभारी आहे

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत