Close

एप्रिल 10, 2017

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत.  इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो.

हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे…

एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत.

मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई दूध-उत्पादन अधिक असेल, दरडोई गाई भरपूर असतील, आणि गाईच्या गोठ्यातून नफाच नफा मिळत असेल ?

मित्रहो, तो एक आदर्श पशुपालन व्यवसाय असेल आणि आदर्श गोठा असेल.

अशा एकाच नाही तर हजारो गोठ्यांचे स्वप्न पॉवरगोठा टीम ने पहिले आहे.

नक्की काय असेल या आदर्श गोठ्यात ते आता पाहू.

पॉवरगोठा टीम च्या कल्पनेतील आदर्श गोठा अर्थात पॉवरगोठा – जातिवंत गाय, मुक्त संचार, मुरघास आणि नियमित आरोग्य तपासणी या चार खांबांच्या भक्कम पायावर उभारलेला असेल.

प्रस्तावना

गाईला आपण गोमाता म्हणतो, आईचा आणि देवाचा दर्जा देतो. कामधेनू म्हणतो. तिच्याकडून सर्व दानाची अपेक्षा करतो दूध, वासरू, शेणखत, गोमूत्र इत्यादी….

पण आपण तिची मातेप्रमाणे काळजी घेतो का?

हो, नाही म्हटले तरी, आपल्यापैकी बरेच लोक, बरेच नाही तर बहुतांश लोक आपल्या गाईंना कुटुंबीयांप्रमाणे वागवतात.

परंतु गोठ्यामध्ये तिला किती आराम आहे ? छान वाटते का ? गाईचे जीवन तणावमुक्त आहे का ? रोगमुक्त आहे का? प्रसूती सुलभ होते का ? या गोष्टींचा विचार तुम्ही केलाय का ?

माणसाला भूक लागली की खायला अन्न, तहान लागली की प्यायला पाणी, आणि जिवंत असल्याचा अनुभव येण्यासाठी फिरायला स्वातंत्र्य लागते. ऊन पाऊस वारा यापासून संरक्षण व्हावे म्हणून छप्पर लागते. आजारी पडू नये, म्हणून लहानपणीच वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण केले जाते. एवढे करून पण माणूस आजारी पडतो, तेव्हा डॉक्टर चा दवाखाना आणि औषधोपचार लागतात.

अहो, याच सर्व गोष्टी पशूंना देखील लागतात की. तुमच्या गोठ्यातील गाय त्याला अपवाद असू शकेल का ?

मग आता या सगळ्या सोई तुम्ही देता असे तुम्ही म्हणाल.

खरंच असे आहे का?

पारंपारिक गोठा आणि पशुपालन

पारंपरिक दुग्ध-व्यवसायामध्ये पारंपारिक गोठा पद्धत वापरली जाते. गाईला मालक आपल्या कुटुंबीयांप्रमाणे जरी वागणूक देत असला, तरी खायला वैरण आणि प्यायला पाणी मालकाच्या वेळापत्रकानुसार देण्यात येते. भूक आणि तहान लागल्यावर तिला वैरण-पाणी मिळावे हा विचार आपल्या मनाला शिवत देखील नाही.

दावणीला गाय वेसण घालून बांधलेली असते. मनसोक्त गाईला फिरत येत नाही. एकाच जागी राहून तिथेच शेण आणि गोमूत्र पडते. मालक मेहनती असेल तर वारंवार गोठा साफ करतो. तरीही बसल्यानंतर गाईचे अंग तसेच सड घाण होतात.

सिमेंट किंवा फरशीचा कोबा असलेला गोठा असतो. त्या कडक जमिनीवर उभे राहून गाईच्या पायांवर ताण येतो.

बांधून घातल्यामुळे, एकाच जागी उभी राहिल्यामुळे, मनसोक्त फिरता ना आल्यामुळे गाय तणावात राहते. योग्य वेळेला म्हणजे तहान लागेल तेव्हा पाणी आणि ठराविक योग्य अंतराने खाद्य ना मिळाल्याने गाईच्या पचन क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे दूध देण्याची शक्ती व क्षमता कमी होते.

ओलावा आणि घाणीशी संबंध आल्याने जिवाणू वाढतात. तणाव तसेच जिवाणू यामुळे गाय वारंवार आजारी पडू लागते.

१२ महिने हिरवा चारा ना मिळाल्यामुळे गाई अशक्त, आणि दूध देण्याची क्षमता कमी कमी होत गेली.

गोपैदास करताना धोरण ना ठेवल्यामुळे तसेच वैज्ञानिक, आणि नैसर्गिक नियमांचे पालन ना केल्यामुळे गाईच्या नव्या पिढी अजून अशक्त आणि रोगट होत गेल्या.

या सर्वांचा परिणाम – आपला दुधाचा धंदा तोट्यात गेला.

या दूध धंद्याला फायद्यात आणण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांच्या बऱ्या-वाईट अनुभवानंतर – जातिवंत गाय, मुक्त संचार, मुरघास आणि नियमित आरोग्य तपासणी ही चतुःसूत्री पॉवरगोठा.कॉम ने तुमच्यासाठी विकसित केली आहे.

सर्व कसे उपलब्ध करून द्यायचे ? आपण ते लेखामध्ये क्रमवार पुढे पाहू.

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – सूत्र क्रमांक १ – जातिवंत गाय

healthy-cow

भरपूर दूध विकुन भरपूर नफा कमवायचा, तर भरपूर दूध देणारी निरोगी गाय आधी असली पाहिजे.

अश्या प्रकारची जातिवंत भरपूर दूध देणारी, उत्तम वंशावळ असणारी, निरोगी गाय कोणीही विकत नाही. लाखो रुपये मोजूनसुद्धा अशी गाय मिळणे फार अवघड आहे. ती गाय आपल्याच गोठ्यात तयार करावी लागेल.

जातिवंत गाय आपल्याच गोठ्यात कशी पैदा करायची याविषयी माहिती –>गोपैदास या लेखात तुम्ही वाचू शकता.

जातिवंत गाय तयार करणेसाठी आपण आपल्या सर्व गाईंची व कालवडींची वंशावळ लिहून ठेवली पाहिजे. म्हणून नोंदवही चे महत्व आहे.

आपल्याकडील सर्व गाई-म्हैशींना वेगवेगळ्या क्रमांकाचा बिल्ला लावला पाहिजे. बिल्ला गळ्यात किंवा कानावर लावता येतो. शक्यतो कानावर लावावा.
त्यानंतर गाईंची ओळख त्यांच्या कानावरील बिल्ल्या (टॅग) नेच झाली पाहिजे. परदेशातील हजारो गाईंच्या गोठ्यामध्ये वापरले जाणारे हे टॅगिंग (बिल्ले) चे तंत्र १ आणि २ गाईंच्या गोठ्यात देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

आता जातिवंत गाय तयार करण्यासाठी आपल्या गाईला लावण करताना उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करावे.
त्या बैलाचा क्रमांक आणि आपल्या गाईचा क्रमांक नोंदवही मध्ये कृत्रिम रेतन म्हणून नोंद करावा.

बैलाचा क्रमांक डॉक्टरांकडील वीर्य कांडीवर लिहिलेला असतो.

समजा बैलाचा क्रमांक ११२ आहे. पुन्हा कधीही या संकरातून पैदा होणाऱ्या कालवडीला किंवा तिच्या खालच्या वंशावळीला ११२ क्रमांकाच्या बैलाचा संकर/लावण करू नये.

कालवडीचे वजन २७५-३०० किलो झाल्याशिवाय कृत्रिम रेतन करू नये. तोपर्यंत तिची शारीरिक ताकद पूर्ण झालेली नसते. अशा अवस्थेत गाभण राहिल्यास प्रसूती चांगली ना होता, वासरू ओढून काढावे लागण्याचा धोका असतो.

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – सूत्र क्रमांक २ – मुक्त संचार

mukta-gotha

मुक्त गोठा, म्हणजे एका विशिष्ट सीमेच्या आत मोकळे सोडलेले पशुधन.

मुक्त संचार गोठ्याबाबत या आधीचा मुख्य लेख तुम्ही येथे   –> वाचू शकता.

मुक्त गोठा करताना एका गाईला २०० वर्गफूट जागा, भोवताली जाळीचे कुंपण, ऊन-पावसापासून बचावासाठी झाडाची, शेडची, शेडनेटची सावली, गाईला खरारा करण्यासाठी काथ्या बांधलेला खांब, पाणी पिणे आणि वैरणीसाठी २ गव्हाणी एवढेच फक्त जरुरी आहे.

मुक्त गोठ्यामध्ये जनावर तणावमुक्त राहते. व्यायाम होऊन स्वास्थ्य चांगले राहते. शेण वारंवार साफ करावे लागत नाही.
मातीच्या, मुरमाच्या तसेच शेण वाळून नरम झालेल्या जमिनीवर फिरणे तसेच बसल्यामुळे गाईच्या पायांवर ताण येत नाही.

तहान लागल्यानंतर पाणी प्यायला मिळते. खरारा करण्यास मिळाल्यामुळे चामडी चकचकीत तसेच घाणमुक्त राहते.
मालकाला अतिशय उत्तम दर्जाचे शेणखत मिळते.

आता जुना गोठा सोडून मुक्त गोठा करायचा म्हणजे नवा खर्च आला. आधीच तोट्यात आहोत आम्ही आणि तुम्ही आम्हाला अजून खर्च सांगा अशीच तुमची भावना असेल.

म्हणूनच कमी खर्चात मुक्त गोठा कसा उभा करायचा यावर आकृती आणि प्लॅन सकट सविस्तर लेख लवकरच प्रसिध्द करू.

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – सूत्र क्रमांक ३ – मुरघास

आपण गोठ्यात गाई मोकळ्या सोडल्या. त्यांना वेळेवर खाण्या-पिण्याची व्यवस्था देखील केली.

आपल्या पॉवरगोठ्यातील जातिवंत गाय नेहमी स्वस्थ राहून जास्तीत जास्त दूध देण्यासाठी तिच्या आहाराची, पोषणतत्त्वांची आपण काळजी घेतली पाहिजे.

हिरवा चारा हा दुभत्या जनावरांसाठी अतिशय पोषक आणि आवश्यक खाद्य आहे. आपण पावसाळा-हिवाळा मध्ये हिरव्या चाऱ्याची तजवीज करतो, जनावर भरपूर दूध देते. पण उन्हाळा आला की, चारा सुकतो, आणि मग कडबा, उसाचे वाडे किंवा चारा छावणी अशी परिस्थिती उद्भवते.

murghas-6

 

हे चक्र तोडण्यासाठी, पोषक वातावरण असताना, चारा पिकवून, तो पुढच्या १२ महिन्यांसाठी साठवून ठेवावा. ह्याच प्रक्रियेला मुरघास आणि इंग्लिश मध्ये सायलेज म्हणतात.

बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकामात मुरघास बनवता येतो.

मुरघास निर्मिती विषयी लेख –> येथे वाचा.

विशिष्ट वास आणि चव असणारा, पिवळ्या रंगाचा मुरघास जनावरे आवडीने खातात. चाऱ्यासाठी वणवण फिरायला न लागल्यामुळे कष्ट आणि खर्चात बचत होऊन धंद्याचे नियोजन करणे सोपे जाते.

वर्षभर एकाच उच्च दर्जाचा हिरवा चारा खायला मिळाल्याने जनावरे भरपूर दूध देतात. पावसाळा ते हिवाळा मधील चाऱ्यातील तफावतीमुळे दुधात होणारी घट कमी होते.

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – सूत्र क्रमांक ४ – आरोग्य काळजी आणि नियमित आरोग्य तपासणी

 

 

 

दूध देणारी गाय, दुभते जनावर म्हणजे वेलेली गाय होय. गर्भ राहिलेल्या स्त्रीप्रमाणेच गाभण आणि दुभत्या गाईची काळजी घेतली गेली पाहिजे.

विशेषतः दुग्ध-व्यवसायातील नफ्याच्या समीकरणाठी तुमच्या गाई आजारी न पडणे किंवा स्वस्थ,निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

गाईंना सर्वात जास्त धोका जिवाणू संसर्गाचा असतो. गोठ्यात वेगवेगळ्या प्रकारे जिवाणू (बॅक्टेरिया) ची वाढ होऊन गाय आजारी पडू शकते.

सिमेंट कोबा असणाऱ्या गोठ्यात ओलावा आणि घाणीमुळे होणारे जिवाणू, अस्वच्छतेमुळे होणारे जिवाणू , दगडी झालेल्या गाईपासून दुसऱ्या गाईला होणारे इन्फेक्शन (संसर्ग) इत्यादी गोष्टी गाय आजारी पडण्याला कारणीभूत होऊ शकतात.

यासाठी तज्ज्ञांकडून वेळोवेळी गाईंची तसेच गोठ्याची तपासणी करून घ्यावी.
गाईंना वेळापत्रकानुसार जंताचे औषध पाजावे.
दुभत्या गाईंना तसेच कालवडींना मिनरल मिक्श्चर (खनिज मिश्रण) द्यावे.
गोचीड होऊ नयेत म्हणून आणि झाल्या तर गोचीड निर्मुलनासाठी काळजी घ्यावी.

powergotha-arogya

अँटिबायोटिक औषधांमधील अंश दुधामध्ये उतरून दुधाची पत खराब होते. दुधाला कमी दर मिळतो. म्हणून अँटिबायोटिक औषधे शक्यतो टाळावीत. हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा तुमची गाय आजारीच पडत नाही.

शक्य असेल, तर गाभण गाईंचा, कालवडींचा वेगळाच कप्पा करावा. मोठ्या गोठ्यांनी तर आजारी गाई, गाभण, आटवलेल्या, दुभत्या गाई आणि कालवडी हे सर्व कप्पे वेगळे करावेत.

गोठ्यातील तापमानावर खासकरून उन्हाळ्यात नजर ठेवावी. संकरित आणि HF गाईंना कमी तापमानाची सवय असते. त्यासाठी, उंच छत, पत्र्यावर पांढरा रंग, झाडांची सावली, गोठ्याच्या भोवताली उंच वाढणारे गवत, पंखे, फॉगर्स इत्यादी उपायांनी उन्हापासून गाईंची काळजी घ्यावी.

अशा प्रकारे चारही आघाड्यांवर तुम्ही काम केलेत तर नक्कीच तुमचा गोठा पॉवरगोठा म्हणून नावारूपाला येईल. भरपूर दूध-उत्पादन, नफा आणि भरपूर पैसे जास्त दूर नसतील.

19 Comments on “यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

Jitendra Rananaware
जानेवारी 15, 2019 at 7:37 pm

मला नवीन गोठा तयार करण्यासाठी आपण माहीती द्यवी

उत्तर
विकास उरकुडे
जुलै 30, 2018 at 1:50 am

सर मला प्रशिक्षण घ्यायचे आहे कुठे चालू असेल तर सांगा

उत्तर
अतुल माने
जून 21, 2018 at 2:59 pm

दुग्धव्यवसाय कोणाचा करवा
गाई का म्हशी
कारण म्हशीच्या दुधाला जास्त मागणी आहे

उत्तर
गणेश कदम
जानेवारी 15, 2018 at 1:47 pm

सर Tag कोठे भेटतात

उत्तर
शरद श्रावण खताळे
जानेवारी 10, 2018 at 11:22 am

मला नवीन गोठा तयार करण्यासाठी आपण माहीती द्यवी

उत्तर
टीम पॉवरगोठा
जानेवारी 11, 2018 at 12:13 am

सर भरपूर माहिती आपल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
विशिष्ट गरजेसाठी आपला ई-मेल चेक करा.

उत्तर
भाऊराव जाधव
डिसेंबर 30, 2017 at 2:38 am

साधारण पणे एक म्हैस वर्षभरात किती महिने व किती दुध देते?

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत