पॉवरगोठा बद्दल - About us | पॉवरगोठा-PowerGotha
Close

पॉवरगोठा बद्दल – About us

महाराष्ट्राला दूध-धंद्यात १ नंबर बनविण्याचे स्वप्न

आपला भारत देश एकूण दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु पारंपरिक पद्धतीने व्यवसाय केल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याजवळील सरासरी जनावरांची संख्या (केवळ १-२ जनावरे) आणि प्रति जनावर प्रतिदिवस दूध उत्पादन अत्यल्प राहिले आहे.

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी देखील पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करत असल्याने बहुसंख्य पशुपालक वर्ग तोट्यामध्ये व्यवसाय करत आहे. आज १-२ जनावरे आहेत आणि ५ वर्षानंतर १० जनावरे झाली असे कुठेही पाहायला मिळत नाही. उलट आज ५० जनावरे आहेत आणि २-३ वर्षांनी धंदा परवडेनासा झाला आणि १० जनावरांवर आला अशा प्रकारची खूप उदाहरणे आहेत.

आज महाराष्ट्रातील जनतेला इच्छा आणि पैसे असून देखील उच्च दर्जाचे निर्भेळ दूध प्यायला मिळत नाही.

या दोन्ही बाजू विचारात घेऊन दूध धंद्याला फायदेशीर बनवून महाराष्ट्राला दुग्ध-व्यवसायात अग्रगण्य बनविण्यासाठी powergotha.com हि वेबसाईट बनविली आहे. संपूर्ण वेबसाईट मराठीत असून तिचा केंद्रबिंदू सामान्य दूधउत्पादक शेतकरी आहे.

आपल्याला शाळेत इतिहास, भूगोल, गणित शिकवतात. परंतु, शेती किंवा पशुपालन जे पारंपरिक चालत आलेले व्यवसाय आहेत, त्यात कोणीही व्यावसायिक (professional) मार्गदर्शन देत नाही. हीच कमतरता पॉवरगोठा वेबसाईट च्या माध्यमातून भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सोप्या शब्दांत, कमीत कमी तांत्रिक शब्द वापरून, फोटो आणि व्हिडिओ चा भरपूर वापर करून हे ज्ञान शेतकऱ्यांच्या गळ्यात आणि डोक्यात उतरविण्याचा प्रयत्न आहे.

आम्ही अशा प्रेरित युवकांची आणि तडफदार पशुपालक शेतकऱ्यांची फौज तयार करू इच्छितो, जी महाराष्ट्राचे दूध उत्पादन – दुधाची प्रत (quality) आणि दुधाची लिटरमध्ये मापसंख्या (quantity) या दोन्ही गोष्टींमध्ये देशात प्रथम क्रमांकावर नेऊन पोचवेल.

दुग्ध-व्यवसाय, शेळीपालन किंवा परसातील कुक्कुटपालन आणि त्यातील नफा नुकसान

दुग्ध-व्यवसाय, शेळीपालन किंवा परसातील कुक्कुटपालन करताना शेतकरी बांधवांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी नफ्यात चालू असलेल्या व्यवसायाला मारक ठरतात. त्यांचा मुकाबला करण्याचे मार्गदर्शन शेतकरी बांधवांना बहुतेकदा उपलब्ध होत नाही.

पशुपालन व्यवसायातील नुकसान हे बहुधा अपुऱ्या ज्ञानामुळेच होते. शेतकरी हतबल होतो आणि व्यवसायात पीछेहाट होते. यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे.

आजकाल इंटरनेट आपल्या हातातील फोन पर्यंत पोचले असून सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. खूप सारी माहिती बोटाच्या स्पर्शावर उपलब्ध आहे. या माध्यमांचा उपयोग जर लोक-कल्याणासाठी नाही करून घेतला तर ते मोठे पाप ठरेल. हे लक्षात घेऊन च पॉवरगोठाचा हा पसारा मांडण्यात आला आहे.

 

या पॉवरगोठा.कॉम वेबसाईट ला डॉ शैलेश मदने यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. शैलेश मदने, वैयक्तिक तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध गाव शहरांमध्ये एकदिवसीय शिबीर घेऊन दूध-उत्पादनाच्या आधुनिक पद्धती शिकवत आहेत. जेथे जेथे डॉक्टर मदने पोचू शकत नाहीत, किंवा त्यांच्या शिबिरानंतर लोकांना संदर्भ मिळावा अधिक माहिती मिळावी या उद्देशाने पॉवरगोठा वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.

दुग्ध-व्यवसाय, शेळीपालन आणि परसातील कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या असंख्य अडचणी, शंका, प्रश्न यांचा समाधानासाठी आणि मार्गदर्शनासाठी पॉवरगोठा तत्पर राहील.  या तिन्ही व्यवसायांमध्ये पैसे, मेहनत यांच्या सोबत योग्य नियोजनाची जोड दिली तर शेतकरी बांधव नेहमीच फायद्यात राहील.

आणि हेच लोक-कल्याणकारी ध्येय आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा ध्यास घेऊन पॉवरगोठा.कॉम ची टीम नेहमी झटत राहील.

पॉवरगोठा.कॉम ला अल्पावधीत भरघोस प्रतिसाद मिळत आहे.  तुमचा आशीर्वाद असाच आमच्या मागे राहावा.

-पॉवरगोठा टीम

वेबसाईट वर आलेले लेख आणि सदरे खालील प्रमाणे

मुक्त संचार गोठा आणि मुरघास
व्हिडीओ

शेळीपालन
स्वच्छ आणि दर्जेदार दूध निर्मितीबद्दल
प्रश्नोत्तरे
प्रतिक्रिया आणि अभिप्राय