दूध धंद्याची मार्केटिंग आणि दूध धंद्याचे ४ P

दूध दर खाली वर होताना बऱ्याच वेळा बोलले जाते की पिण्याचे पाणी देखील २० रुपये लिटर ने मिळते, आणि दुधाची किंमत त्यापेक्षाही कमी आहे.
हे बोलणारा आणि ऐकणारा त्याचा राग व्यक्त करत असतो. केलेल्या मेहनतीचा योग्य परतावा न मिळणे याबद्दल आलेल्या निराशा आणि रागातून असे व्यक्त होते आणि ते साहजिकच आहे.
पण हे योग्य आहे का ? खरच दुधाची किंमत पाण्यापेक्षा कमी केली जाते का ?
उत्तर देण्याआधी एक गोष्ट वाचू चला (उत्तर लेखाच्या शेवटी आहे, पूर्ण लेख नीट समजून वाचला तरच उत्तर समजेल आणि तुमचे जीवन ही बदलून जाईल)
गोष्ट अशी – गौतम बुद्ध एकदा रस्त्याने चालले असताना अनुयायांनी प्रश्न विचारला “रागावर कसे नियंत्रण करावे?”
गौतम बुद्ध म्हणाले “मला अचानक खूप तहान लागली आहे”
त्यांचे अनुयायी जवळच्या एका तलावात पाणी आणायला गेले. तेथे बैलगाडी जाणे, लोकांचे पोहणे, इत्यादी क्रिया चालू असल्याने पाणी गढूळ झाले होते, पिण्यायोग्य अजिबात नव्हते.
अनुयायी हात हलवत परत आले. गौतम बुद्धांनी विचारले अरे, पाणी आणायला गेला होतात ना ?
अनुयायांनी त्यांना सारी गोष्ट सांगितली.
बुद्ध म्हणाले, थांबा इथेच थोडा थकवा आला आहे.
अर्ध्या एक तासाने पुन्हा गौतम बुद्धांनी अनुयायांना पाणी आणायला जायला सांगितले.
यावेळी त्यांचे शिष्य तलावावर गेले असता, तलावाचे पाणी अतिशय शांत, शुभ्र होते.
ते आनंदाने पाणी घेऊन बुद्धांकडे आले आणि पाणी प्यायला दिले.
गौतम बुद्ध म्हणाले,
“का पाणी स्वच्छ झाले कळले का ? आपल्या मनाचे असेच आहे.”
“जेव्हाही राग, लोभ, भीती, चिंता यामुळे मन त्रस्त असेल, त्याला थोडी विश्रांती द्या. विचारांचे पाणी निवळले की सर्व काही स्पष्ट दिसू लागेल.”
मनाच्या खेळांबद्दल बुद्धांना सर्व काही समजले होते आणि त्यांनी ते शिष्यांना सोप्या पद्धतीत समजावले.
दूध धंद्याबद्दल तुम्हाला नेमकी माहिती आहे का हो?
नसेल तर ती तुम्ही करून घेतली पाहिजे.
आपण काही विशेष गोष्टी आज जाणून घेऊ.
दूध उत्पादन हा एक व्यवसाय आहे बिझनेस आहे, ज्याला डेअरी फार्मिंग असेही म्हणतात.
त्यामुळे बिझनेस मॅनेजमेंट चे सारे फंडे त्याला लागू पडतात.
बिझनेस मॅनेजमेंट मध्ये कोणतेही उत्पादन किंवा सेवा यांची विक्री किंवा विपणन साठी त्या उत्पादनाबद्दल ४ P शिकवले जातात
१. प्रॉडक्ट – उत्पादन –> नेमके काय उत्पादन आहे
२. प्राईस – किंमत –> त्याची किंमत किती आहे
३. प्लेस – जागा –> कुठून कशाप्रकारे विकले जाते
४. प्रोमोशन – जाहिरात –> लोकांना त्या उत्पादनाबद्दल माहिती कशी मिळते
वरील सर्व एक – एक करून सविस्तर पाहू.
१. प्रॉडक्ट – उत्पादन
नेमके उत्पादन काय आहे?
त्याचे गुणधर्म काय आहेत ?
त्यामुळे काय फायदे होतात ?
ते वापरायला सोपे आहे का ?
ते लोकांना हवेहवेसे वाटते का ?
इतर कंपन्यांपेक्षा या उत्पादनामध्ये खास काय आहे ?
अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट बद्दल माहिती जमवू शकता.
उदाहरणार्थ,
बाईक किंवा मोटरसायकल बनविणाऱ्या होंडा, हिरो, बजाज, टीव्हीएस अशा अनेक कंपन्या आहेत.
त्या त्या कंपन्यांच्या गाड्यांचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये तुम्हाला माहित असतील च.
गाडीचे CC, डिझाईन, मायलेज इत्यादी गुणधर्म पाहून त्याची जाहिरात केली जाते आणि लोक देखील या गोष्टींचा विचार करून खरेदीचे निर्णय घेतात.
एखाद्या नव्या कंपनी ला नवीन गाडी बाजारात आणायची असेल तर किती CC ची गाडी असेल, तिचे डिझाईन काय बनवू, तिच्यामध्ये काय काय वैशिष्ट्ये देऊ? या प्रश्नांना अनुसरून त्या कंपनीची मार्केटिंग धोरणे ठरवली जातात.
२. प्राईस – किंमत
उत्पादन किती किंमतीला उपलब्ध आहे?
त्याची बनवण्याची किंमत (उत्पन्न खर्च) किती आहे ?
त्याचे स्पर्धा करणारे इतर ब्रँड्स किती किमतीला उपलब्ध आहेत ?
लोकांना ते उत्पादन महाग वाटते? की स्वस्त वाटते ?
नियम: महाग उत्पादने कमी आणि स्वस्त उत्पादने जास्त प्रमाणात विकली जातात
पण अति महाग आणि अतिस्वस्त हे दोन्ही प्रॉडक्ट फेल होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
आणि काही अतिमहाग वस्तुंना अनाकलनीय मागणी असू शकते.
उदाहरणार्थ, apple कंपनीचे मोबाईल फोन. ते दरवेळी मागच्यापेक्षा महागडा फोन घेऊन येतात, तरीही लोकांच्या त्यावर उड्या पडतात.
ते किती साईझ मध्ये (मिली, किलो, डझन, बॉक्स, छोटा २ रु चा पॅक इ.) मध्ये उपलब्ध आहे.
– २ रु चा सॅशे पॅकिंग हे जगातील मोठे संशोधन होते – भारतात त्याचा शोध लागला आहे.
अतिप्रचंड लोकसंख्येचा फायदा घेऊन २ रु चे उत्पादन विकून देखील शाम्पू कंपन्यांनी फायदा मिळवला
त्यासाठी कर्जसुविधा, लोन उपलब्ध आहे का ? (financing)
– उदाहरणार्थ, कार, घर, बाईक या गोष्टी कर्ज देणाऱ्या संस्थांच्या मदतीने जास्त विकले जातात
-मोबाईल, वॉशिंग मशीन, AC , फ्रिज या वस्तू EMI ने विकल्या जातात
३. प्लेस – जागा
उत्पादन लोकांपर्यंत कसे पोहोचते? (डिस्ट्रिब्युशन)
थेट कंपनी विक्री करत आहे ? की डिस्ट्रिब्युटर, होलसेल, रिटेल जाळे वापरून विक्री केली जाते ?
कोणत्या दुकानात उपलब्ध असते ? (चॅनेल)
– पानपट्टी, किराणा दुकान, मोठे डिपार्टमेंटल स्टोर, डी – मार्ट, तालुका ठिकाणचे डीलर शोरूम, पोस्टाने ऑर्डर, ऑनलाईन ऑर्डर, फोन-व्हाट्सअप ने ऑर्डर
दुकानात ते कोठे ठेवले जाते ?
– ग्राहकांना एखादे प्रॉडक्ट कधी दिसते यावर सुद्धा विक्री अवलंबून असते, किराणा आणि इतर दुकानात चिप्स चे पॅकेट नेहमी बाहेर लटकवलेले दिसतात, काही कंपन्या खास स्टॅन्ड बनवून त्यावर आपले चिप्स आणि तत्सम पदार्थ ठेवतात
कॅडबरी, कोकाकोला पेप्सी अशा कंपन्या खास फ्रिज, आणि बॉक्स बनवून दुकानदाराची सोय करतात
४. प्रोमोशन – जाहिरात
कशाप्रकारे प्रॉडक्ट किंवा सेवे ची माहिती ग्राहकांच्या मेंदूपर्यंत पोचवली जाते याचे उत्तर म्हणजे उत्पादनाची जाहिरात होय.
होर्डिंग वर जाहिराती, फेसबुक वर जाहिराती, टीव्ही वर, रेडिओ एफएम वर जाहिराती, वर्तमानपत्रातील, मासिकातील जाहिराती, वेगवेगळे इव्हेंट्स प्रायोजित करून केलेल्या जाहिराती इत्यादी प्रकार येतात.
लोकांना एखादे उत्पादन हवेहवेसे वाटण्यासाठी काय शक्कल लढवली जाते ?
आयपीएल, पेप्सी, कोकाकोला, कॅडबरी, या सहज आठवणाऱ्या जाहिराती
हमारा बजाज नावाची जाहिरात तुम्हाला माहित असेलच
मॅकडॉनल्ड्स में है कुछ बात असे म्हणत विदेशी वडापाव कंपनी ने २०० रु चा वडापाव सहज विकला.
नेमके काय सांगितल्यावर लोक आकर्षित होतात यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, ते या छोट्या लेखात सांगणे शक्य नाही.
निष्कर्ष:
तुमचे उत्पादन आणि व्यवसाय हिट होईल का फेल हे सर्वकाही या ४ पी वर अवलंबून असते.
एखादे उत्पादन लोकांनी का डोक्यावर उचलले, खूप प्रतिसाद का दिला याची करणे या ४ पी मधून अचूक सांगता येतात.
एखादे उत्पादन खास बनले आणि लोकांच्या मनात भरले तर ते हिट होते, भरपूर विकले जाते. कंपनीचा भरपूर फायदा होतो.
दूध धंद्याचे ४ पी आपण खाली एक-दोन उदाहरणे देऊन पाहू
Product – उत्पादन (प्रकार )
दूध धंद्याबद्दल म्हणायचे झाले तर
दूध, दुधाचे पदार्थ ही मुख्य उत्पादने आहेत.
दूध – यात गाईचे दूध, म्हैशींचे दूध असे मुख्य प्रकार होतील.
या दुधाचे गुणधर्म साधारणपणे फॅट (fat) आणि एस एन एफ (SNF) याद्वारे मोजले जातात.
मग तुमचे दूध आणि शेजारच्या गोठ्यातील दुधात काय फरक करू शकता ?
Price – दर (किंमत )
साधारणपणे दुधाला जास्त फॅट आणि एस एन एफ असेल तर जास्त किंमत मिळते.
फॅट आणि एसएनएफ जनावरांचा आहार आणि गाईंचे जनुकीय गुणधर्म यावर ठरतात.
दूध हे एक व्यापारी माल (Commodity – कमोडिटी) या प्रकारात मोडणारे उत्पादन असल्याने तसे पाहायला गेले तर फॅट एसएनएफ वर तुम्ही इतर दूध-उत्पादकांशी स्पर्धा करू शकत नाही. म्हणजे सर्व दूध-उत्पादक एक सारखेच उत्पादन बनवतात.
म्हणूनच दूध गोळा करणाऱ्या कंपन्या, सहकारी दूध संघ एका निर्धारित fixed दराने तुमचे उत्पादन खरेदी करतात. काही नवीन संघ स्पर्धा करण्यासाठी कमी अधिक दर देऊ करतात, परंतु साधारणतः सर्वांचे दर जवळपास एकसारखेच असतात.
Place – जागा
तुमच्या गोठ्यात तयार होणारे दूध, चिलर (शीतकरण) सुविधा नसेल, तर लगेचच विकावे लागते. अन्यथा ते नाशवंत असल्याने खराब होण्यास सुरुवात होते.
अशी सुविधा उपलब्ध करणे, सामान्य एकट्या शेतकऱ्यास शक्य नसते
म्हणूनच संघटित शक्ती असलेले दूध संघ तुमच्याकडून दूध खरेदी करून पुढे डिस्ट्रिब्युशन आणि विक्री करतात.
ज्यांचे शहरांत किंवा, शहराच्या बाजूला गोठे असतील अशा काही जणांना शक्य असेल तर असे दूध उत्पादक थेट विक्री करून रिटेल चा दर आपल्या दुधाला मिळवून देऊ शकतात.
Promotion – जाहिरात
गीर गाईचे किंवा इतर भारतीय देशी गाईंचे (साहिवाल, सिंधी, लाल कंधार, खिल्लार, इ.) दूध A२ प्रथिनयुक्त आणि हेल्दी, आरोग्यवर्धक म्हणून जाहिरात करून जास्त किंमतीला विकले जाते.
अमूल नावाच्या सहकारी चळवळीतून जन्माला आलेल्या कंपनीने अमूल गर्लला मध्यभागी ठेऊन दूध आणि दुधाचे पदार्थ (चीझ, लस्सी, पियुष, दही, बटर, पनीर इ. ) यांना वलय आणि मागणी मिळवून दिली आहे.
जिभेला पाणी सुटणारी चित्रे आणि आकर्षक पॅकेजिंग (बाटल्या) वापरून जाहिरात करून महागडे फ्लेवर्ड मिल्क सहज विकले जाते.
हे झाले दूध धंद्याचे ४ P. लिहिण्यासारखे बरेच आहे परंतु थोडक्यात उत्तरे द्या असे म्हणून आता बस करतो.
आता तुम्ही म्हणाल, या सर्वांचा आणि लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या दूध/मिनरल वॉटर तुलनेचा काय संबंध ?
सांगतो
गोष्टीचा बोध
मिनरल वॉटर ची बाटली तुम्ही ट्रेनमधून, बसमधून, कार मधून प्रवास करताना २० रुपयेला सहज विकत घेता.
परंतु बोरिंग मधून उपसलेले, विहिरीतून, किंवा थेट नदीतून किंवा थेट नळातून भरलेले प्रक्रिया न केलेले पाणी बाटलीत बंद करून तुम्ही २० रु लिटर ने घ्याल का ?
नाही.
उपसा केलेले पाणी मोफत किंवा जास्तीत जास्त २-३ रु लिटर ने मागाल किंवा घेणार सुद्धा नाही.
मिनरल वॉटर हे फिनिश्ड प्रॉडक्ट आहे. तयार उत्पादन, त्यावर इतर प्रक्रियेची आवश्यकता नाही.
तसेच ते बस, कार, ट्रेन, हॉटेल मध्ये तुमच्या हातात येण्यापूर्वी पूर्ण वितरण व्यवस्थेमध्ये फिरून येते, प्रत्येक स्टेप ला होलसेलर, रिटेलर इ चे मार्जिन सांभाळून मग
थेट पाणी उत्पादक आपले हजारो लिटर पाणी एकावेळी २० रु लिटर ने नाही विकू शकत. या व्यवस्थेला मार्जिन पुरवठा करून देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी २० रु ने विकत घेतात तेव्हा ती विक्री यशस्वी होते.
तसेच दुधाचे आहे
दूध-उत्पादक आपल्या गोठ्यातील २० लिटर, ३० लिटर, १०० लिटर दूध रोजच्या रोज दूध काढल्या काढल्या पूर्ण विक्री करू शकत नाही.
त्याला डिस्ट्रिब्युशन व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो.
त्याच्याकडून कच्चा माल (दूध) २० ते ३० रु लिटरने विकत घेऊन, वितरण कंपन्या फिनिश्ड गुड्स (पक्का माल) म्हणजे पिशवीबंद दूध, दूध पावडर, फ्लेवर्ड मिल्क, दही, तूप, खवा, पनीर, चीझ आदी गोष्टी बनवतात आणि आपल्या वितरण व्यवस्थेतील विविध घटकांना मार्जिन देऊन विकतात.
ही व्यवस्था कोणत्याही कारणाने हलल्यास उत्पादकाला १८ रु रेट मिळेल का ३० रु मिळेल हे ठरते.
याला अपवाद जे गोठेधारक थेट शहरात रोज किरकोळ विक्री स्टॉल लावून किंवा घरोघरी पोहोच देऊन करतात त्यांचा आहे. त्यांना रिटेल भाव मिळतो. परंतु यासाठी त्यांना स्वतःची वितरण व्यवस्था बसवावी लागते.
मग आता पुढच्या वेळी कोणी पाण्याची बाटली आणि दुधाचा दर तुलना करेल तेव्हा ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा
बरं, समजलं – पण पुढे काय ? आम्हाला काय फायदा ? आम्हाला तर रेट कमीच मिळतोय की ?
तुम्ही काय करू शकता ?
वरील ४ पी समजून घेऊन त्यातील एखादा तुम्हाला बदलता येतो का ते पहा.
तुम्ही तुमचे उत्पादन खास बनविण्यासाठी काय करू शकता?
काय अशी जादू आहे की तुमचे उत्पादन तुम्ही हिट करू शकता, आणि जास्त किंमतीला विकू शकता ?
तुम्ही तुमच्या गोठ्यातील दुधाला खास बनविण्यासाठी, स्वच्छ दूध निर्मिती आणि आकर्षक मार्केटिंग या गोष्टींची कास धरू शकता.
तुमच्यापैकी काही लोकांना शहरातील महागड्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा योग आला असेल, तर तुम्हाला हे माहिती असेल
फ्लेवर्ड मिल्क म्हणजे, दुधाला थोडा फ्लेवर देऊन बाटलीबंद करून २०० मिली दूध २०० रुपयांपेक्षा अधिक ला विकले जाते, आणि घेणारे देखील आनंदाने विकत घेतात, आणि त्यापेक्षाही आनंदाने पितात. उदाहरणार्थ – Keventers केव्हेन्टर्स
इतरही स्पर्धा करणारी उत्पादने आहेत जसे की, अमूल कुल, फ्रोझन बॉटल इत्यादी
दुधापासून बनवली जाणारी १००-२०० मिली कॉफी १००-३०० रुपयांना विकली जाते.
उ. CCD – कॅफे कॉफी डे, स्टारबक्स इत्यादी
गीर गाईचे दूध A२ प्रकारचे आहे हे सांगून ९० रु लिटरहून अधिक ला विकले जाते.
प्राईड ऑफ काऊज या नावाने स्वच्छ दूध ८० रु लिटरहून अधिक ला विकले जाते.
१. म्हणून शक्य असल्यास स्वतः किंवा ग्रुप ने दुधाला ब्रॅण्डिंग करता येते का ते पहा. ब्रॅण्डिंग फक्त रिटेल विक्री साठीच नाही तर संघाला सुद्धा दूध घालताना, स्वच्छ दूध निर्मिती, अँटिबायोटिक फ्री, रेसिड्यू फ्री मिल्क अशा प्रकारे तुम्ही उत्पादन आणि मार्केटिंग केले तर चांगला दर मिळू शकतो.
२. वितरण व्यवस्था करणे अशक्य आणि विक्री किंमत हातात नसेल तर, उत्पादन खर्च कमी करा.
उत्पादन खर्च कमी करणेसाठी आधी उत्पादन खर्च किती आहे हे जाणून घ्या.
जमा खर्च सोप्या पद्धतीने मोजण्यासाठी पॉवरगोठा ॲप डाउनलोड करा
३. गोठ्याचे व्यवस्थापन सुधारा.
गोठ्याला पॉवरगोठा बनवा.
४. गोठ्यात १० लिटर च्या ५ गाई संभाळण्या ऐवजी २५ लिटर च्या २ गाई सांभाळा.
२५ लिटर च्या गाई विकत मिळत नसतील किंवा महाग मिळत असतील तर अशा जातिवंत गाई गोठ्यातच तयार करा.
त्यासाठी पॉवरगोठा अँप डाउनलोड करा, पैदाशीच्या नोंदी नीट लिहून ठेवा, प्रत्येक पिढीमध्ये वेगळा आणि उच्च क्षमतेचा वळू वापरून क्रमवार पिढ्यांमध्ये जनुकीय दूध उत्पादन क्षमता वाढवा.
५. गोठ्यात देशी गाईदेखील सांभाळा किंवा देशी गाईंचा गोठा करा – अर्थात हे करताना सावधगिरी बाळगा. यात देशी गाईंची उत्पादन क्षमता, तिचा भाकडकाळ , तिची प्रजननक्षमता इत्यादी गोष्टींचा विचार करा. आजूबाजूला इतक्या महाग दुधाला मार्केट आहे का याची चाचपणी करा. महाग दुधाला तशी कमी मागणी आहे हे लक्षात घ्या. देशी गाईंचे देखील उत्पादन क्षमता वाढली आणि पुरवठा वाढला तर दूध दर कमी होऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या.
वरील गोष्टी लक्षात न घेतल्यास कडकनाथ कोंबडीची गोष्ट जास्त जुनी नाही.
गोठ्याला पॉवरगोठा बनवा.
६. वर्षभराच्या चाऱ्याचे एकदाच नियोजन मुरघास बनवून करा.
७. गाई आजारीच पडू नयेत, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय जसे की – मुक्त गोठा, सावली, कोरडी जागा, स्वच्छ पाणी, वेळेवर लसीकरण, आरोग्य तपासणी, CMT चाचणी, स्वच्छ दूध निर्मिती, स्ट्रिपिंग-डिपींग इत्यादी गोष्टी आत्मसात करा आणि त्याचा अभ्यास तसेच अवलंब करा.
तुम्ही हा लेख वाचून आपल्या गोठ्यात, आपल्या धंद्यात काय बदल करणार हे आम्हाला कमेंट्स मधून कळवा.
वरील सर्व माहिती झाली दूध या तुमच्या गोठ्यातील मुख्य प्रॉडक्ट ची.
तुमच्या गोठ्यात अजून एक छुपे उत्पादन आहे, ज्यातून तुम्हाला बक्कळ पैसे मिळू शकतात.
त्याबद्दल पुढील लेखात – तोवर सस्पेन्स
तोपर्यंत तुम्ही पॉवरगोठा ॲप डाउनलोड करा, गाईंची माहिती भरा, कृत्रिम रेतन ची माहिती भरा, 9112219610 या क्रमांकाला स्क्रिनशॉट व्हाट्सअप करा आणि पॉवरगोठा अँप प्रीमियम १ महिनेसाठी मोफत मिळवा
Prashant Hajari
ऑक्टोबर 13, 2020 at 2:55 amMahitipuran lekh
अविनाश तुकाराम पांढरे
ऑक्टोबर 12, 2020 at 4:59 pmखूप छान माहिती दिली आहे, त्याचा ऊपयोग कसा करावा याचाही विचार करावा लागतो, धन्यवाद
Alkesh Mohatkar
ऑक्टोबर 12, 2020 at 5:02 am,छान माहिती दिलीत…..
Popat keskar
ऑक्टोबर 12, 2020 at 2:50 amVery nice information
SAGAR KALE
ऑक्टोबर 11, 2020 at 9:28 amसर नमस्कार मी सागर काळे
मला दुध व दुध प्रक्रिया या बदल माहिती पाहिजे आहे