दूध धंद्यातील नोंदी कोणत्या, कशा आणि कुठे ठेवाल ?

नोंदवही आणि दूध-धंदा याबद्दल हा लेख आहे.
दूध धंद्यातील अडचणी आणि विविध नोंदींचे महत्त्व
नवीन दूध धंदा चालू करणारे भरपूर उत्सुक युवक आहेत. दरवर्षी होणारे वासरू, २०-३० लिटर दूध देणाऱ्या संकरित गाई, भरपूर दराने विकले जाणारे देशी गाईंचे A२ दूध, इत्यादी आकर्षणे पाहून इच्छुक बनणारे खूप लोक आहेत ज्यांनी यापूर्वी कधीच दूध व्यवसाय केला नसेल.
त्याच बरोबर त्यांच्या विरोधी मत असणारे आणि त्यांना परावृत्त करणारे दूध व्यावसायिक सुद्धा भरपूर आहेत.
कारण एकच – दूध धंदा परवडत नाही.
आधीच दुष्काळ, मुरघास केलेला नाही, लाळ्या खुरकूत ची साथ, वर्षभर कमी राहिलेले दूध दर आणि सतत आजारी पडणारी जनावरे. कसा परवडेल धंदा ?
धंदा कसा परवडेल याची उत्तरे शोधण्यासाठी नेमका या धंद्यात खर्च किती होतो आणि उत्पन्न किती निघते हे बघावे लागेल. फार थोडे लोक या गोष्टींचा बारकाव्याने अभ्यास करून मैदानात उतरतात.
उत्पन्न, खर्च, गुंतवणूक, जनावर खरेदी, उच्च प्रतीच्या जातिवंत गाईंची पैदास, स्वच्छ दूध निर्मिती या सर्व गोष्टींचा मेळ घालण्यासाठी एक मूलभूत गोष्ट जरुरी आहे.
नोंदी ….
कोणत्याही धंद्यातील नोंदी म्हणजे धंद्याचा हिशोब म्हणजेच त्या धंद्याचा आरसा होय.
दूध धंद्यातील नफातोटा कसा काढतात हे आपण या आधीच्या लेखात इथे वाचले आहे.
या लेखात आपण त्या नफ्या तोट्याच्या उत्तरापर्यंत पोचण्यासाठी कोणत्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे ते पाहू.
जातिवंत गाईची निर्मिती बद्दल तुम्ही येथे वाचले असेल. तर या लेखात आपण आपल्या गोठ्यातील उच्च प्रतीच्या गाईच्या आणि कालवाडीच्या नोंदी कशा ठेवता येतील ते पाहू.

नोंदवही – नफ्यातील दुग्ध व्यवसाय – Record Book – Dairy Farming in Maharashtra Marathi
दूध धंद्यातील नोंदी कोणत्या ? कशा प्रकारे मोजता येतील ?
दूध धंदा करताना नफा-तोटा, उत्पन्न, खर्च, चारा, दूध, कामगार, रेतन, डी वर्मिंग, गाईंचे वजन, जन्म मृत्यू, खरेदी-विक्री, आजार-औषधोपचार इत्यादी नोंदी ठेवणे क्रमप्राप्त आहे.
नफा तोटा काढण्यासाठी उत्पन्न व खर्च – रोजचा, महिन्याचा आणि वर्षाचा वेगवेगळा माहीत असावा लागतो. हा तुम्ही नोंदवही मध्ये लिहून ठेवा.
पॉवरगोठ्याच्या आदर्श रूपासाठी आम्ही हा नफा तोटा रोजचा रोज मोजावा अशी संकल्पना राबवतो आहोत.
तर रोजचा उत्पन्न आणि खर्च कसा हिशोब करायचा आपण हे क्रमवार आणि तपशीलवार पाहूया.
खर्च
खर्चामध्ये चारा, कामगार/लेबर, डॉक्टर, औषधे, रेतन, इतर खर्च इत्यादींचा समावेश होतो.
कच्चा माल (चारा) खर्च
दूध धंदा चांगल्या प्रकारे चालावा, गाईंनी भरपूर आणि एक समान मात्रे मध्ये दूध द्यावे यासाठी समतोल आहार (बॅलन्सड राशन – Balanced Ration) देणे गरजेचे आहे. समतोल आहाराबद्दल आपण पुढील लेखात जाणून घेऊ. तत्पूर्वी आहारावरील खर्च मोजुया. समतोल आहारमधील चारा आणि इतर खाद्य हा थेट आणि मोठा खर्च आहे.
त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
हिरवा चारा
कोरडा चारा
पशुखाद्य
सप्लिमेंट
यांना आपण एक प्रकारे कच्चा माल म्हणू शकतो.
एकूण कच्चा माल खर्च = ( हिरवा चारा खर्च + कोरडा चारा खर्च + पशुखाद्य खर्च + सप्लिमेंट खर्च )
हा खर्च रोजच्या रोज मोजावा. आणि नोंदवही मध्ये एंट्री करावी.
हिरव्या चाऱ्यावर झालेला खर्च मोजण्यासाठी किती किलो हिरवा चारा रोज लागतो, हे माहित करून घ्यावे. याची सोपी पद्धत अशी आहे.
तुम्ही ज्या पाटी किंवा भांड्यातून चारा खायला टाकताय तिचे चाऱ्यासहित आणि चाऱ्याविना वजन करा. ही कृती फक्त एकदाच करण्याची गरज आहे. तुम्हांला एका पाटीत बसणाऱ्या चाऱ्याचे वजन कळेल.
तुम्ही सर्व जनावरांना मिळून किती पाट्या, भांडी भरून चारा टाकताय याचे उत्तर काढल्यास एकूण चाऱ्याचे वजन तुम्हाला मिळेल
एकूण चारा (किलोमध्ये) गुणिले चाऱ्याचा दर ( रुपये प्रतिकिलो मध्ये) = एकूण चाऱ्यावरील खर्च (रु.)
दर काढण्यासाठी तुमच्या आजूबाजूला मकेचा फड कशा दराने उपलब्ध आहे ते पाहा. स्वतःच्या शेतातील चाऱ्याचा प्रत्येक किलोमागे साधारणतः 1.5 ते 2 रु खर्च येतो.
तशीच कृती तुम्ही कोरडा चारा ( कडबा) मोजण्यासाठी सुद्धा करावी.
म्हणजेच कुठलाही कच्चा माल खर्च मोजण्यासाठी खालील सूत्र वापरावे.
कच्चा माल खर्च = प्रमाण (किलोमध्ये) x दर (रु प्रति किलो मध्ये)
कच्चा माल म्हणजे हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्य, सप्लिमेंट होय. पशुखाद्याचे प्रमाण आणि दर तुम्हांला पुरवठादाराकडून मिळेल किंवा त्या पिशवी पॅकिंग वर लिहिलेले असेल. पशुखाद्यामध्ये विविध प्रकारची पेंड, सरकी, खापरी, गोळी, शेंगदाणा, सोया, मका भरडा, पावडर इत्यादींचा समावेश होतो.
सप्लिमेंट मध्ये खनिज मिश्रण, व्हिटॅमिन, कॅल्शिअम, गाभण काळात दिली जाणारी सप्लिमेंट इत्यादींचा समावेश होतो.
सप्लिमेंट कमी प्रमाणात दिले जात असलेने तिचा खर्च मोजताना ग्रॅम ला किलो मध्ये रूपांतर करून घ्यावे.
उदाहरणार्थ काही शेतकऱ्यांकडे कमी जनावरे असल्यास, खनिज मिश्रण (मिनरल मिक्श्चर) किंवा सप्लिमेंट किंवा पशुखाद्य यांचे प्रमाण १ किलो पेक्षा कमी म्हणजे उदाहरणार्थ १०० ग्राम भरते. अशा वेळी तुम्ही १०० ग्राम किलो मध्ये बदलून लिहावे. तुमचे उत्तर अपूर्णांकामधे असेल.
१०० ग्राम म्हणजे ०.१ किलोग्रॅम. ५०० ग्राम म्हणजे ०.५ किलोग्रॅम.
नफा-तोट्याचे उत्तर बरोबर येण्यासाठी न चुकता वरील काळजी घ्यावी.
कामगार खर्च
तुमच्या गोठ्यात लेबर कामाला असेल, तर कामगार खर्च मोजावा लागेल. एका कामगाराचा महिन्याला पगार १०,००० असेल तर दिवसाला अंदाजे ३३० रुपये कामगार खर्च होईल. अत्याधुनिक पद्धतीने आणि अचूक मोजदाद करायची असेल तर घरची जी मंडळी दूध धंद्यात फुलटाईम राबत आहेत, त्यांचा सुद्धा पगार तुम्ही कामगार खर्च म्हणून मोजू शकता. पुन्हा सफल दूध-धंदा करण्यासाठी हे सर्व नोंदवही मध्ये नियमित लिहावे.
एकूण कामगार खर्च = प्रति कामगार दैनिक पगार x कामगारांची एकूण संख्या
म्हणजेच २ कामगार तुमच्या कडे १०००० रु पगारावर असतील तर तुमचा रोजचा कामगार खर्च रु ६०० होय.
रेतन, डॉक्टर, औषधे आणि इतर खर्च
अशा प्रकारे रोज लागणाऱ्या खर्चाच्या नोंदी ठेवल्यानंतर आपण आवश्यक पण अनियमित होणाऱ्या इतर खर्चाच्या नोंदीकडे वळू
यात पुढील गोष्टी येतात
रेतन खर्च
डॉक्टर फी खर्च
औषधे खर्च
इतर खर्च
रेतन खर्च
एक गाय लावण्यासाठी डॉक्टर अंदाजे २०० रु घेत असतील तर एखाद्या दिवशी झालेला खर्च खालील प्रमाणे मोजावा
एकूण रेतन खर्च = प्रति रेतन रु x रेतन केलेल्या गाईंची संख्या
उदाहरणार्थ १५ ऑक्टोबरला २०० रु प्रमाणे २ गाई लावल्या असल्यास त्यादिवशी चा रेतन खर्च ४०० रु असेल.
डॉक्टर फी आणि औषधे खर्च
डॉक्टरांची भेटीची, इंजेक्शन ची , गाय तपासण्याची जी काही फी अथवा शुल्क असेल ते आहे तसे लिहावे. तसेच औषध खर्च देखील ज्या दिवशी जितका असेल तितका पूर्ण लिहावा. अर्थातच ज्यावेळी गाई आजारी असतील त्या दिवशी तुमचा खर्च वाढून नफा कमी दिसणार आहे.
यामुळेच नफ्यातील दूध धंद्यासाठी, गाई आजारीच पडू न देणे किती महत्वाचे आहे हे कळते.
इतर खर्च
इतर खर्चामध्ये लाईट बिल, इतर छोटा मोठा दुरुस्ती खर्च, तसेच वर समाविष्ट नसलेला खर्च पकडावा.
तर मंडळी मग तुमचा रोजचा खर्च असेल → हिरवा चारा + कोरडा चारा + पशुखाद्य + सप्लिमेंट + कामगार + डॉक्टर/रेतन/औषधे + इतर खर्च
अशा प्रकारे खर्चाच्या सर्व नोंदी झाल्यानंतर आपण उत्पन्नाच्या नोंदींकडे वळूया.
उत्पन्न नोंदी
कोणत्याही गोठ्यात उत्पन्नामध्ये मुख्यतः दूध, दुधाचे पदार्थ किंवा शेणखत या गोष्टींचा समावेश होतो. जनावर खरेदी विक्री बाबत आपण नंतर बोलणार आहोत.
दूध – संख्या
रोजचे दूध सकाळ आणि संध्याकाळचे लिटर मध्ये प्रमाण आणि त्याचा दर मोजावा. संघाला दूध घालत असाल तर शक्यतो तुम्ही घातलेले दुधाचे विविध आकडे – लिटर मध्ये प्रमाण, प्रतिलिटर दर आणि फॅट एस एन एफ तुम्हाला SMS द्वारे मोबाईल वर मिळू शकते. नसल्यास स्वतः नोंदी मोजाव्यात.
रोजचे एकूण दूध उत्पन्न = सकाळचे उत्पन्न + संध्याकाळचे उत्पन्न
एका वेळचे उत्पन्न (सकाळ किंवा संध्याकाळ) = दुधाचा दर (प्रति लिटर) x दुधाची संख्या (लिटर मध्ये)
अशा प्रकारे दुधाच्या उत्पन्नाच्या नोंदी रोज ठेवाव्यात
दुथाचे पदार्थ आणि इतर उत्पन्न
दुधाचे पदार्थ विकत असल्यास देखिल सारखेच सूत्र वापरावे
रोजचे उत्पन्न (दुधाच्या पदार्थापासून) = रोजचा विकलेला माल प्रमाण (किलो, लिटर किंवा इतर) x दर (प्रतिकिलो किंवा प्रतिलिटर)
उदाहरणार्थ खवा उत्पन्न पासून करायच्या नोंदी
४ किलो खवा विकला असेल २५० रु प्रमाणे तर १००० रु उत्पन्न पकडावे.
शेणखत
मुक्त गोठा असेल, तर तुमच्या गोठ्यातून सूर्याच्या उन्हामुळे आणि गाईंच्या चालून शेण विखुरण्यामुळे आपोआप तयार होणाऱ्या शेणखताचे उत्पन्न देखील भरपूर निघते.
ते खालील प्रमाणे मोजू शकता.
रोजचे उत्पन्न (शेणखत) = रोजचा विकलेला माल प्रमाण (किलो मध्ये ) x दर (प्रतिकिलो)
किती किलो माल विकला हे पाहण्यासाठी, शेणखत विक्री करताना ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये शेणखत भरल्यानंतर त्या ट्रॉलीचे वजन करून तुम्ही प्रमाण मोजू शकता. हे मोजमाप सुद्धा एकदाच करण्याची गरज आहे.
उत्पनाच्या नोंदी आपण पाहिल्या. त्याचसोबत आपण प्रगतीकडे अग्रेसर होण्यासाठी तुमच्या उत्पदनांची गुणवत्ता तपासणे देखील आवश्यक आहे. उच्च गुणवत्तेचे स्वच्छ दूध निर्मिती करून अधिक दर मिळवायचा असेल तर हे अधिक आवश्यक ठरते.
उत्पन्न गुणवत्ता नोंदी
फॅट व एस एन एफ
दुधाच्या गुणवत्तेच्या दोन प्रमुख नोंदी तुम्ही रोजच्या रोज ठेवल्या पाहिजेत.
तुमच्या गोठ्यातील दुधाचे सरासरी, फॅट आणि सरासरी एस एन एफ (SNF). या दोन्ही नोंदी तुम्ही संघाला दूध घालत असाल तर तुम्ही घातलेले दुधाचे विविध आकडे – सरासरी फॅट आणि एस एन एफ तुम्हाला SMS द्वारे मोबाईल वर मिळू शकते.
रोजच्या रोज या नोंदी लिहून ठेवाव्यात. दुधाला मिळणारा दर या दोन बाबींवर अवलंबून असल्यामुळे त्यातील चढ उतार आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
खालील प्रमाणे नोंदी ठेवाव्यात
दिवस – सकाळचे दुधाचे फॅट आणि एस एन एफ । संध्याकाळच्या दुधाचे फॅट आणि एस एन एफ
सरासरी नोंदींसोबत च महिन्यातून एकदा किंवा तुम्हांला शक्य असेल तेव्हा खालील नोंदी ठेवाव्यात
प्रति गाय फॅट आणि एस एन एफ
शेतकरी आमच्या गोठ्याला फॅट लागत नाही किंवा एस एन एफ लागत नाही अशी तक्रार खूपदा करताना दिसतो. फॅट एस एन एफ कमी लागत असेल तर त्याचे कारण एखादी गाय आजारी असणे, जंत झालेले असणे, पचन न होणे किंवा गाईची अनुवांशिकतेनुसार क्षमता नसणे ही असू शकतात.
कुठलेही कारण असले तरी वर्षातून एकदा तरी तुमच्या प्रत्येक गाईचे फॅट आणि एस एन एफ तुम्ही मोजावे आणि लिहून ठेवावे. खालील प्रमाणे नोंद करावी.
दिवस – गाय क्रमांक – फॅट , एस एन एफ
जनावर खरेदी जनावर विक्री
एखाद्या गोठ्यातील जनावरे रोज बदलत नाहीत. उत्तम पॉवरगोठा असेल जातिवंत जनावरे असतील तर कालवडी विक्रीतुन मोठे उत्पन्न मिळू शकते. जनावर खरेदी किंवा विक्री ही स्थावर मालमत्ता नोंद असलेने ही नोंद रोजच्या उत्पन्न खर्चापेक्षा वेगळी असावी. नोंद खालील प्रमाणे करावी.
विक्री
दिवस – जनावर क्रमांक – विक्री उत्पन्न रु.
खरेदी
दिवस – जनावर क्रमांक – खरेदी खर्च रु.
दूध-धंद्यातील नफा-तोटा
अशा प्रकारे सर्व उत्पन्न-खर्च नोंदी केल्यानंतर तुम्ही गोठ्यातील अचूक नफा-तोटा मोजू शकाल.

दूध धंद्याचा हिशोब – Dairy Farming Maharashtra
नफा-तोटा मोजण्याबद्दल अधिक माहिती तुम्ही येथे वाचू शकता.
इतर अतिमहत्वाच्या नोंदी
इतर नोंदींमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
गोठ्याचे आरोग्य
गोठ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित सफाई, निर्जंतुकीकरण फवारणी करणे गरजेचे आहे. त्याची नोंद खालील प्रमाणे करावी
दिवस – निर्जंतुकीकरण फवारणी – खर्च – वापरलेले औषध – पुढील फवारणीची तारीख
गाईंचे आरोग्य
गाईंचे कालवडींचे आरोग्य, पचन उत्तम राहण्यासाठी नियमित लसीकरण, जंताचे औषध देणे गरजेचं आहे. त्याच्या नोंदी खालील प्रमाणे कराव्यात
दिवस – जंताचे औषध दिले – कोणते औषध दिले – पुढील औषध देण्याची तारीख
दिवस – गाय क्रमांक – कोणते लसीकरण केले
पैदास नोंदी, रेतन नोंदी – जातिवंत गाय निर्मिती (काऊ ब्रीडिंग)
जनावर बाजारात शक्यतो कोणीही चांगली गाय विकत नसलेने आपल्याच गोठ्यात जातिवंत निरोगी, भरपूर दूध देणारी गाय तयार करणे हा एक च उपाय राहतो. त्यासाठी उत्तम गोपैदास धोरण राबवणे गरजेचे आहे. त्यातील महत्वाचा भाग म्हणजे रेतन नोंदी होय.
खालीलप्रमाणे रेतन नोंदी कराव्यात
दिवस – गाय क्रमांक – वीर्य कांडी क्रमांक (अथवा बैलाचे नाव) – रेतन खर्च
रेतन नोंदी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
आपण आपल्या सर्व गाईंना वेगवेगळे नंबर (अनुक्रमांक) देऊन ठेवावेत. उदाहरणार्थ, अमुक एका पॉवरगोठाच्या ४ गाईंना मालकाने १, २, ३ आणि ४ असे क्रमांक दिले आहेंत.
असेच क्रमांक त्यांनी त्या गाईंना होणाऱ्या कालवडींना सुद्धा द्यावेत. उदाहरणार्थ ४ गाईंना २ कालवडी झाल्या त्यांचे क्रमांक ५, ६ असू शकतात.
असाच क्रमांक डॉक्टर कडे असणाऱ्या वळूच्या वीर्याला सुद्धा असतो.
तो क्रमांक ते वीर्य ज्या कांडीत भरलेले असते त्या कांडीवर सुद्धा लिहिलेला असतो. तो देखील लिहून घ्यावा.
म्हणजेच दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी, १४ क्रमांकाच्या गाईला, १००५ क्रमांकाच्या वळूने रेतन केले अशी नोंद त्यांच्या वहीत केली जाईल.
म्हणजे पुढच्या वेळी १४ क्रमांकाच्या गाईला १८ क्रमांकाची कालवड झाली तर त्या कालवाडीला रेतन करताना १००५ क्रमांकाचा वळू लावता कामा नये. तसे झाल्यास जवळच्या नातलगांमध्ये प्रजनन झाल्यामुळे पुढची पिढी कमी शक्तीची तसेच रोगट पैदा होऊ शकते.
या व्यतिरिक्त जातिवंत गाय निर्मिती, (ब्रीडिंग) करण्यासाठी कृत्रिम रेतन किंवा रेतन करण्यासाठी वापरलेल्या बैलाच्या आईचा क्रमांक, आईची दूध उत्पादन क्षमता, वडील बैल क्रमांक, वडिलांच्या आईची दूध उत्पादक क्षमता ही माहिती सुद्धा साठवून ठेवू शकता.
सिमेन स्ट्रॉ किंवा नायट्रोजन वीर्य कांडी वरील माहिती कशी वाचावी याबाबत लेख येथे वाचा
जन्म मृत्यू नोंदी
रेतन नोंदींसोबत आपसूक येणारा भाग म्हणजे जन्म नोंद.
गोठ्यात झालेल्या जन्मासंबंधी खालील नोंदी कराव्यात
दिवस – कालवड/वळू – जन्माच्या वेळी वजन – आईचा क्रमांक – वडिलांचा क्रमांक
लगेचच त्या कालवडीला नंबर देऊन घ्यावा.
या सोबतच आईचे वार्षिक दूध, फॅट, एस एन एफ, वडिलांच्या आईचे दूध इत्यादी नोंदी या कालवडीच्या नोंदींसोबत तुम्ही ठेवू शकता.
मृत्यू संबंधी खालील प्रमाणे नोंद करावी.
दिवस – जनावर क्रमांक – मृत्यूचे कारण
स्थावर गुंतवणूक नोंदी
गोठ्यातील रोजच्या कच्चा माल किंवा इतर खर्चापेक्षा वेगळा असा खर्च म्हणजे स्थावर मालमत्ता गुंतवणूक. याला खर्चामध्ये पकडू नये.
स्थावर मालमत्ता मध्ये खालील बाबींचा समावेश होतो.
गोठा बांधकाम,
जमीन
मिल्किंग मशीन
कुट्टी मशीन,
गोठा सॉफ्टवेअर
दूध वाहन यंत्र इत्यादी
गाय खरेदी किंमत
याची नोंद खालील प्रमाणे करावी
दिवस – स्थावर मालमत्ता प्रकार – गुंतवणूक रु मध्ये
समारोप
या प्रकारे बारकाईने प्रत्येक नोंद वेळच्या वेळी आणि नियमित स्वरूपात केल्यास तुम्ही खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूपात दूध धंदा करण्याकडे पाऊले टाकायला लागता. तुमच्या धंद्याला फायद्यात येऊन भरभराटीची सुरुवात व्हायला मग जास्त वेळ लागत नाही.
तुम्ही तुमच्या नोंदी कशा प्रकारे ठेवताय हे आम्हाला कमेंट्स मधून कळवा.
वरील किचकट नोंदी सोप्या पद्धतीने कायमस्वरूपी राहाव्यात म्हणून आम्ही पॉवरगोठा पशुपालन ॲप बनवले आहे. दूध धंद्याच्या सर्व नोंदी ठेवणे साठी आणि जातिवंत गाई तयार करण्यासाठी आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा यात आहे.
ॲप डाउनलोड करण्याची लिंक – येथे डाउनलोड करा
टीप:
देशी गाई
देशी गाईंचा गोठा असेल तर बऱ्याचदा दुधापेक्षा इतर उत्पन्न जास्त असते. उदाहरणार्थ गोमूत्र, साबण, तूप इत्यादी. देशी गाईंना देखील वरील नोंदी पुरेशा आहेत. तरीही लवकरच देशी गाईंच्या अर्थकारणासंबंधी आणि नोंदींसंबंधी विशेष लेख प्रसिद्ध करू.
रिपोर्ट, अहवाल
अशा प्रकारे नियमित, शिस्तबद्ध रीतीने, पद्धतशीर नोंदी रोजच्या रोज ठेवल्यास वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट किंवा अहवाल तुम्ही त्यापासून मिळवू शकता. म्हणजेच वर्षभर काम केल्यानंतर गोठ्याचे प्रगती पुस्तक तुम्ही बनवू शकता. गोठा पास आहे की फेल हे कळू शकते.
अहवाल कोणत्या प्रकारचे असतील आणि कसे मिळू शकतात हे आपण पुढील लेखात पाहू.
तळटीप: जातिवंत, निरोगी गाई पाळून दुग्धव्यवसाय मध्ये जास्त नफा कमावता येतो
जातिवंत, निरोगी गाई ज्या वर्षभर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात आणि सहसा आजारी पडत नाहीत. वेळेवर गाभण राहतात. ह्या गाईंची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून, कमी दर असतानादेखील मालकाला त्यांना सांभाळून दूध-धंदा करणे परवडते
आता अशा आदर्श जातिवंत गाई विकत तर कोठेच मिळत नाहीत. त्या आपल्या गोठ्यातच योग्य गोपैदास धोरण राबवून तयार करता येतात. त्यासाठी नियोजन, नोंदी, आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते.
जातिवंत गाई तयार करण्यास सोपे जावे म्हणून आम्ही एका उत्कृष्ठ अशा मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. त्यात सर्व रेतन नोंदी अचूक रित्या करून गाभण खात्री, गाय आटवण्याची आठवण करून देणारा SMS, डिलिव्हरी ची आठवण इ सुविधा तुम्ही मिळवू शकता.
तुम्ही जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर खालील लिंक वरून डाउनलोड करा.
Rohit Kamble
एप्रिल 28, 2020 at 1:45 pmAapan course provide karta ka, fees gheun.
Swapnil ashok kulkarni
जुलै 3, 2020 at 12:48 pmMala mazya gavat dugdha dhanda chalu karaecha ahe tar mala aaple margadarshan have ahet.
Sunil Marathe
फेब्रुवारी 26, 2020 at 12:59 amखुप छान माहिती आहे देशी गायीच्या गोठ्यासाठी
Sunil shejul
ऑगस्ट 10, 2019 at 11:34 amKharach Khupch avashak mahiti aahe
Shantanu Deshmuk
जुलै 23, 2019 at 11:00 amHo hi mahiti kharacha faydyachi aahe
Shantanu Deshmuk
जुलै 23, 2019 at 10:59 amHo hi mahiti kharch faydeshir Aahe.
PRAKASH SADASHIV MESHRAM
एप्रिल 16, 2019 at 7:52 ampowergotha marfat dileli mahiti utkrustha aahe.Navin Dugdha Wavsaykarita preranadai tharel.
टीम पॉवरगोठा
एप्रिल 17, 2019 at 12:55 amDhanywad Prakash
Kumar patil
एप्रिल 15, 2019 at 6:06 amMukahat gotuachi Mhaiti patva