दुग्ध व्यवसाय आणि लॉकडाऊन दिवस क्र १ | पॉवरगोठा-PowerGotha
Close

मार्च 25, 2020

दुग्ध व्यवसाय आणि लॉकडाऊन दिवस क्र १

Dairy Farming and Lock Down day 1

लॉक डाऊन दिवस क्र १

नवीन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन ची घोषणा काल रात्री २४ मार्च २०२० रोजी ८ वाजता केली.
आज पासून पुढील २१ दिवस आपल्याला ही बंदी निभवायची आहे. लॉकडाऊन का जरुरी आहे, त्यावर उहापोह पोस्ट च्या शेवटी आहे.
तत्पूर्वी आपण हे २१ दिवस सत्कारणी कसे लावू शकतो हे पाहू.
या संपूर्ण बंदी मधून मूलभूत सेवा आणि वस्तू वगळल्या असून दूध त्या वगळलेल्या वस्तूंमध्ये समाविष्ट आहे.   म्हणून आपली हालचाल दुग्धव्यवसाय चालवण्यापुरती चालू राहील.  बाकीच्या सर्व हालचाली बंद होऊन आपण जास्तीत जास्त वेळ घरात घालवावा लागेल.  हेच अपेक्षित आहे आणि हाच आपण सर्वांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
या २१ दिवसांत तुम्ही काय काय करू शकता ?  आमच्या टीमच्या डोक्यात आलेले काही विचार खाली देत आहोत.

सर्वसाधारण सूचना आणि उपाय

  1. २१ दिवसांत एखादी चांगली सवय आपण लावून घेऊ शकतो.  उदाहरणार्थ तंबाखू बंद करणे.
  2. आपल्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवून आपल्या मुलांचा अभ्यास घेऊ शकतो. यात त्यांना जमत नसलेला एखादा अवघड विषय तुम्ही समजावू शकता.
  3. स्वतः चे ज्ञान वृद्धी – इंटरनेट आणि मोबाईल सेवा चालू राहणार आहेत.  गूगल बाबा आणि युट्युब ताई यांच्या मदतीने माहितीच्या अथांग सागरातून तुम्हाला हव्या त्या विषयासंदर्भात अधिक माहिती मिळवा.  नवीन उद्योग, मार्केटिंग आयडिया, अर्थ विषयक माहिती, गुंतवणूक बद्दल माहिती, बँक व्यवहार संबंधी माहिती, ऑनलाईन बँकिंग शिकणे इ.
  4. व्यायाम – घरच्या घरी जोर बैठक, सूर्यनमस्कार इ सोपे व्यायाम करून खड्डे आणि मोटार सायकल ने खिळखिळे झालेले शरीर थोडे से दुरुस्त करू शकता.
  5. स्वयंपाक शिकून घेणे – जगातील सर्वात महत्वाची जीव वाचवणारी कला.  भविष्यात असे अनेक लॉकडाऊन होऊ शकतात.  एकट्यानेही राहायला लागू शकते. स्वयंपाक यायलाच हवा.  डाळ भात पासून सुरुवात करा.  कुठल्याही अडचणीत स्वतः ला वाचवता आले पाहिजे.
  6. हिशोब ठेवायला शिकणे – वेगवेगळ्या गोष्टींचा, शेती, कर्ज,  खर्च, उत्पन्न, उधारी, इ गोष्टींचा हिशोब पक्का करा. किती येणार आहेत आणि किती जाणार आहेत याचा पत्ता लावा.
  7. ई-मेल वाचायला शिका – बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड किंवा तत्सम स्मार्ट मोबाईल आणि इंटरनेट आहे परंतु त्यात त्यांना स्वतःचा ई-मेल आय डी माहीत नसतो. भविष्यात सर्व रेकॉर्ड्स /नोंदी/सर्टिफिकेट/प्रमाणपत्रे ऑनलाईन होणार आहेत आणि त्यात तुम्हाला तुमचा ई-मेल आय डी माहित असला पाहिजे, इनबॉक्स उघडता आला पाहिजे.  जमत नसल्यास तुमच्या ज्या मित्राला ते येते त्याच्या कडून व्हिडीओ कॉल ने शिकून घ्या.  पॉवरगोठा टीम देखील तुमच्याशी बऱ्याच वेळा ई-मेल ने पत्रव्यवहार  करते. ते तुम्हाला वाचता येतील.  – ई-मेल लिहायला शिकणे पुढची पायरी आहे आपण २१ व्या दिवशी याची आठवण करून देऊ.
  8. विमा – जीवन आणि आरोग्य विमा यांची माहिती करून घ्या.  जीवन बेभरवश्याचे आहे याची उपरती आतापर्यंत तुम्हा सर्वांना झाली असेल च. तुम्ही कमावत आहात आणि वय कमी आहे तोपर्यंत स्वस्तात विमा मिळतो.  जीवन विमा मध्ये तुमच्या मृत्यू पश्चात कुटुंबियांना मोठी रक्कम मिळते. खासकरून टर्म पॉलिसी मध्ये तुम्हाला जास्त विमा रक्कम मिळते.  आरोग्य विम्यात तुम्ही आणि कुटुंबियांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागल्यास सर्व किंवा बराचसा खर्च विमा कंपनी देते.
  9. मदत करा- तुम्ही योग्य प्रकारे कमवत असाल तर ज्यांच्या घरी या लॉकडाऊन मध्ये उत्पन्न बंद होऊन अडचण होणार आहे त्यांना मदत करा.
तुम्हांला अजून काही आयडिया असतील, तर कमेंट मधून किंवा ई-मेल करून कळवा पुढच्या पोस्ट मध्ये त्यांचा समावेश करू.

पशुपालन आणि दुग्धव्यवसाय शी संबंधित चांगल्या सवयी आणि सुधारणा

या २१ दिवसांत तुम्ही तुमच्या दुग्धव्यवसायामध्ये सुद्धा प्रगती करू शकता. कसे ते खाली पाहू.
  1. ज्ञानवृद्धी – पॉवरगोठा वेबसाईट वरील सर्व लेख वाचा.  सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.  NDDB च्या वेबसाईट वर देखील तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा.
  2. मुरघास नियोजन –  ज्यांचा मुरघास तयार आहे त्यांना या लॉकडाऊन मध्ये रोज चारा आणण्याचे टेन्शन नाही.  तुम्ही पण अशा पंक्तीत सामील व्हा.  घर बसल्या पुढच्या १-१.५ वर्षासाठी किती हिरवा चारा लागणार आहे याचे अंदाजे गणित मांडून त्याचे प्लॅनिंग नियोजन करा.  उदाहरणार्थ एका गाईला अंदाजे २०-२५ किलो दररोज चारा लागत असेल तर महिना ६०० किलो आणि वर्षाला ७ टन – १० एक सारख्या गाईंना ७० टन  अशाप्रकारे तुमच्या गाईंच्या आहार नियोजनाप्रमाणे गणित मांडा. लॉकडाऊन उघडल्यावर पहिली संधी मिळताच मुरघास बनवून ठेवा.  मुरघास निर्मिती संबंधी लेख येथे वाचा मुरघास निर्मिती १मुरघास निर्मिती २  व्हिडीओ बॅग मुरघास 
  3. स्वच्छ दूध निर्मिती  – चांगल्या सवयी लावा. डिपिंग स्ट्रिपिंग प्रक्रिया वापरा. दूध काढण्यापूर्वी  डीप कप मध्ये सड बुडवून काढा.  स्वच्छ कापडांनी सड पुसून घ्या.   हात साबणाने स्वच्छ धुवून धार काढा.  दूध काढल्यानंतर पोस्ट डीप मध्ये सड  बुडवा. स्वच्छ दूध निर्मिती लेख 
  4. मस्टायटिस / दगडी प्रतिबंधात्मक उपाय – गोठ्यात ओलावा निर्माण होऊ देऊ नका.    मुक्त गोठा नसेल तर सतत गाईंची जागा बदला. जमीन अनेकवेळा धुवून काढा.  शेण वारंवार सरकवून ठेवा. सड स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. मुक्त गोठा असेल तर ओलावा शक्यतो टाळता येतो.  आणि वरील सर्व श्रम वाचतात. मुक्त गोठयासंबंधी माहिती येथे वाचा.
  5. शेळीपालन आणि देशी कुक्कुटपालन विषयी माहिती ऑनलाईन मिळवा. पुन्हा गुगल दादा आणि युट्युब ताई मदतीला आहेतच.
  6. विविध उपयोगी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा-  या क्षेत्रात काम करणारे बरेच व्हाट्सअप ग्रुप आहेत. त्यात समाविष्ट व्हा, योग्य प्रश्न विचारा, चर्चा करा आणि एकमेकांच्या अनुभवातून प्रगती करा. केवळ जॉईन करून झोपलेला मेंबर बनू नका.
  7. फवारणी –  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही हात धुणे, सॅनिटायझर इत्यादी शिकला असालच.  अशाच प्रतिबंधात्मक उपायांची गोठ्यात देखील गरज असते.  जंतुनाशक प्रतिरोधात्मक फवारणी तुमच्या गोठ्यात देखील करून घ्या.  लॉकडाऊन मुळे शक्य न झाल्यास उघडल्या उघडल्या ही क्रिया करा. दगडी आणि इतर अनेक रोग आजारापासून बचाव आणि खर्चात बचत करण्याचा हा जादुई उपाय आहे.
  8. व्यवसायाचा हिशोब – वर लिहिलेल्या मुद्द्यांमध्ये जीवनातील हिशोब सांगितला होता. तशाच प्रकारे तुम्ही दूध धंद्याचा हिशोब देखील लिहून ठेवू शकता. कसा हिशोब मांडावा याचे प्राथमिक माहिती येथे वाचा.  किती खर्च रोज होतो, किती उत्पन्न रोज येते, कधी उत्पन्न कमी होते, कशामुळे खर्च वाढतो, उत्पन्न कमी होते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा.
  9.  पॉवरगोठा ॲप  डाउनलोड करा, वापरायला शिका, वापरायला सुरुवात करा –  ॲप येथे डाउनलोड करा.  पॉवरगोठा पशुपालन नोंदवही ॲपमधील प्रश्न तुमच्या दिनक्रमामधीलच आहेत.  गाई, म्हैस, हिरवा चारा, कोरडा चारा, लेबर यावरील खर्च, दुधाचे उत्पादन, फॅट, एस एन एफ, शेणविक्री इत्यादी मिळकत तसेच गोठ्यातील पैदाशीच्या नोंदी, जनावरांमधील आजार आणि औषधोपचाराचा नोंदी सर्व काही तुम्ही ॲप मध्ये लिहून ठेवू शकता.  ही उत्तरे रोज लिहिली की तुम्हाला रोज मिळकत, खर्च, पैदास, आरोग्य, चारा, इत्यादींवरील वेगवेगळे अहवाल  (रिपोर्ट) प्रगतिपुस्तकामध्ये पाहायला मिळतील.  तुमची माहिती तुम्ही रोज आणि मागच्या दिनांकासाठी सुद्धा भरू शकता.  रिपोर्ट मोबाईल स्क्रीन वर पहा किंवा  PDF अहवाल तुम्ही ई-मेल ने मिळवू शकता.   वेळच्या वेळी, गाय गाभण असलेची खात्री करण्यासाठी आठवण करून देणारे नोटिफिकेशन आणि  गोठा निर्जंतुक करण्याची आणि जंताचे औषध पाजण्याची सुद्धा आठवण नोटिफिकेशन द्वारे तुम्हाला मिळेल.  ॲप कसे वापरावे येथे वाचा 

लॉकडाऊन अथवा स्वातंत्र्य असो, पूर्णतः थांबणे शक्य नाही. अशाप्रकारे लॉकडाऊन सत्कारणी लावून आपल्या जीवनात शक्य ती प्रगती करा.

 

लॉकडाऊनचे महत्व

वरती सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन बद्दल उहापोह करू.

कोरोना विषाणू मुळे कोविद -१९ (COVID – 19)  हा रोग होतो.  शक्यतो रुग्ण बरे होतात. परंतु अतिशय संसर्गजन्य रोग असल्याने सर्वांना एकावेळी किंवा एकामागोमाग हा रोग होतो. अशावेळी आपल्या रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण तयार होऊन ज्या रुग्णांना अतिदक्षता विभाग किंवा तीव्र उपचारांची गरज पडेल ती न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढते.  हे टाळण्यासाठी जगातील प्रमुख देशांनी लॉकडाऊन चा पर्याय अवलंबला आहे.  भारत सुद्धा त्यात समाविष्ट झाला आहे.

कोरोना विषाणू कसा पसरतो ?

ज्याला कोरोना संसर्ग झाला असेल, त्याच्या खोकल्यातून, किंवा शिंकेमधून निघणाऱ्या तुषारांमध्ये कोरोना विषाणू असतात.  असे हे कोरोना विषाणू धातू, कापड इ पृष्ठभागांवर भरपूर तास जिवंत राहतात – असे पृष्ठभाग म्हणजे बसमधील दरवाजे, हॅण्डल, सीट, एकमेकांशी हात मिळवताना, लिफ्ट वापरताना, टेबल, खुर्ची इ ठिकाणी हा विषाणू असू शकतो. तिथे हात लावल्यास तुमच्या हातावर तो विषाणू येतो आणि असा विषाणूयुक्त हात आपण सहज आपल्या नाक,  तोंड,डोळे, कान इ ठिकाणी लावतो तेव्हा कोरोना आपल्या शरीरात प्रवेश करतो.

अदृश्य पेशंट

कोरोना विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर कधी कधी लगेच त्याचे गुण दाखवतो आणि पेशंट ला खोकला, ताप, घसा जड होणे, श्वसन त्रास इ लक्षणे दिसतात. पण कधी कधी कोरोना विषाणू च्या incubation period वाढ होण्याचा कालावधी १४ दिवसपर्यंत कोणतेही लक्षण दिसत नाहीत.  कधी कधी स्वस्थ व्यक्ती मध्ये कोरोना विषाणू असतो, परंतु कधीच कोणतेही लक्षण दिसत नाहीत.  असे अदृश्य पेशंट कोरोना विषाणू फैलावण्याचे काम मात्र करू शकतात.  म्हणूनच सोशल डिस्टंसिंग म्हणजे अंतर ठेवून वागण्याचे सल्ले सतत दिले जातात.  म्हणून कोणत्याही प्रकारे गर्दी करू नका, एकमेकांपासून शक्य तितके लांब राहा, संकट टळे पर्यंत

लॉकडाऊन यात कशी मदत करतो

लॉकडाऊन मुळे एकमेकांशी संपर्क बहुतांश रित्या कमी होतो.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे गुणाकार बंद होतो. एक व्यक्ती किती लोकांना फैलावेल याचा वेग कमी होतो.   अशाप्रकारे फैलाव कमी झाल्यावर १४ दिवसात ज्याला कोणाला लक्षणे दिसतील  त्यांना वेगळे ठेवणे त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाते. सरकारी यंत्रणा, रुग्णालये यांना तयारी करण्यास वेळ मिळतो.

लॉकडाऊन नसल्यास आजारी व्यक्तींचा गुणाकार होऊन आरोग्य सेवा व्यवस्था कोलमडून पडण्याची खात्री असते. ज्याचे उदाहरण इटली, इराण, स्पेन या देशांमध्ये दिसत आहे.

हात धुण्याचे महत्व

वर सांगितल्याप्रमाणे, विषाणूयुक्त हात चेहऱ्याला लावल्याने विषाणू आपलय शरीरात प्रवेश करतो.   साबणाने २० सेकंद पर्यंत नीट हात धुतल्यास हा विषाणू मरतो. म्हणून पंतप्रधान, मुख्यमंत्री, सरकार, सर्व सेलिब्रिटी, तुम्हाला हात धुण्यास सांगत आहेत.

म्हणून बाहेर जाऊन आल्यास लगेच पहिली क्रिया हात धुण्याची करावी.  सॅनिटायझर ने देखील विषाणू मरतो , म्हणून हात धुणे शक्य नसल्यास सॅनिटायझर वापरावा.

 

हात धुणे, चेहऱ्याला हात न लावणे या प्रतिबंधात्मक क्रिया आहेत आणि त्या फुलप्रूफ नाहीत.

म्हणून शक्यतो, अजिबात बाहेर पडू नका, अनावश्यक भेटी टाळा, लॉकडाऊन पाळा, एकमेकाला आणि देशाला या संकटातून बाहेर पडायला मदत करा. 

 

One Comment on “दुग्ध व्यवसाय आणि लॉकडाऊन दिवस क्र १

Krishnamukund
मार्च 25, 2020 at 3:24 pm

नमस्कार,मी दुध घेऊन खवा तसेच पेढा चा व्यवसाय करतो …. बंद मुळे सर्व दुकाने बंद आहेत, दुधा चे काय करावे काही तरी पर्याय सांगा

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत